ई-वेस्ट पासून ६०० ड्रोन बनविण्याचा 'प्रताप'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 06:00 AM2020-02-05T06:00:00+5:302020-02-05T06:00:09+5:30
वयाच्या चौदाव्या वर्षी लागली गोडी; २२ व्या वर्षी १२८ देशातून आले निमंत्रण
- श्रीकिशन काळे
पुणे : वयाच्या चौदाव्या वर्षी त्याला ड्रोनचे वेड लागले आणि तो आज केवळ २२ व्या वर्षीच आधुनिक तंत्रज्ञानाचा ड्रोन बनविणारा जागतिक वैज्ञानिक बनला आहे. तो ई-वेस्ट पासून ड्रोन तयार करतो आणि आतापर्यंत ६०० ड्रोन तयार केले आहेत. आता तो अनेक संस्थांसोबत काम करत असून, ड्रोन बनविण्यासाठी त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर गोल्ड मेडलही मिळाले आहे. प्रताप एन. एम. असे त्याचे नाव असून, तो एका कार्यक्रमासाठी पुण्यात आला होता. तेव्हा त्याने आपल्या यशाचा पट उलगडून सांगितला.
कर्नाटक मधील निताकली या एका लहानशा गावातून शिक्षण घेत ड्रोनमध्ये ‘एकलव्य’ बनून आज तो जगासाठी ‘ड्रोन गुरू’ बनला आहे. प्रतापने स्वत:मधील कला जाणून या ड्रोनच्या क्षेत्रात उंच भरारी मारली आहे. वयाच्या चौदाव्या वर्षी आकाशातील गरूडाला पाहून ड्रोनबाबतची त्याची उत्सुकता वाढली. आपणही असे ड्रोन बनवू असे ठरवून तो कामाला लागला. सुरवातील ८८ वेळा तो यात फेल झाला. पण तरी त्याने जिद्द सोडली नाही. प्रयत्न करीत राहिला. ड्रोनला पैसे जमा करण्यासाठी तो एका ठिकाणी स्वच्छता करायचा. त्याचे त्याला २० रुपये मिळायचे. ते पैसे जमा करून अनेक वैज्ञानिक आणि संशोधकांना ईमेल पाठवून ड्रोनबाबत माहिती विचारायचा. अशा प्रकारे शिकत शिकत प्रतापने ड्रोनवर प्रभुत्व मिळविले. स्वत:कडे आणि वडिलांकडे काहीच पैसे नव्हते. म्हणून ई-वेस्टपासून ड्रोनची कल्पना सुचल्याचे प्रताप सांगतो. कर्वेनगर येथील भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्क्टिटेक्ट फॉर वूमन येथे कार्यशाळेसाठी आले होते.
वयाच्या १६ व्या वर्षी त्याने अखेर ड्रोन बनवले. पण ते फक्त उडणारे आणि फोटो काढणारे होते. प्रतापला त्यापेक्षा वेगळे ड्रोन तयार करायचे होते. ई-वेस्ट पासून त्याने ड्रोन तयार करण्याचे ठरवून तो त्याच्या शोधात फिरत होता. ई-वेस्ट पासून ड्रोन तयार करून आंतरराष्ट्रीय ड्रोन स्पर्धेसाठी त्याने आपले ३६० किलोचे ड्रोन तयार केले. पण जपानला होत असलेल्या स्पर्धेला जाण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. अनेकांकडे त्याने मदत मागितली पण कोणीच दिली नाही. घरची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. वडिल महिन्याला १ हजार रूपये देखील कमवत नव्हते. तेव्हा त्याच्या आईने मंगळसूत्र मोडून त्याला जपानला पाठवले. तिथे जाताना त्याला प्रचंड त्रास सहन करावा लागला. जपानच्या स्पधेर्साठी १२० देशांनी सहभाग घेतला होता. त्यात सर्व देशांचे प्रतिनिधी आपल्या दोन-दोन शिक्षकांसह आले होते. पण प्रताप एकटा होता. तेव्हा तिथे प्रतापला गोल्ड मेडल मिळाले. तो क्षण त्याच्यासाठी खूप मोलाचा होता कारण ते पदक देशासाठी होते, अशा भावना प्रताप याने व्यक्त केल्या.
=======================
ड्रोन वाचवतोय माणसांचे प्राण
आपतकालीन परिस्थितीत मदत करणारे ड्रोन तयार केले आहेत. नुकताच कर्नाटकमध्ये पूर आला होता. तेव्हा कर्नाटक सरकारने माझ्या ड्रोनचा वापर केला. पूरग्रस्त लोकांना अन्न, औषध पोचविण्याचे काम ड्रोनने केले. ड्रोनच्या मदतीने हजारो लोकांचे प्राण वाचले आहेत.
- प्रताप एन. एम., सीईओ, एरोव्हेल स्पेस अॅँड टेक्नॉलॉजी
=======================================
परदेशी जाण्यास लागणाऱ्या एका सहीसाठी ८ दिवस उपाशी...
जपानला जाण्यासाठी प्रतापला चेन्नई येथील एका प्राध्यापकाची सही हवी होती. त्याला चेन्नईला जायला पैसे देखील नव्हते. तरी तो कसे तरी रेल्वेने चेन्नईला गेला. पण त्याला पाहून प्राध्यापकने सही दिली नाही. बीएसस्सी करणारा विद्याथीर्देखील तू वाटत नाहीस, असे ते प्राध्यपक त्याच्याकडे पाहून बोलले. तरी प्रतापने धीर सोडला नाही. तो तिथेच थांबला. हातात पैसे नव्हते म्हणून त्याला एक आठवडा उपाशी राहावे लागले. ३६ दिवसानंतर त्याला त्या प्राध्यापकाने सही दिली आणि त्याचा जपानला जाण्याचा मार्ग मोकळा झाला.