प्रतापगडावरून मानाचा पताकाधारी ‘शौर्य’ अश्व देहूकडे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:29 PM2019-06-24T12:29:31+5:302019-06-24T12:31:41+5:30
देहू ते पंढरपूर पायी वारी सोहळा; तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणार
अकलूज : देहू ते पंढरपूर पायी आषाढी वारीत जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सामील होण्यासाठी लोकनेते प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचा मानाचा पताकाधारी ‘शौर्य’ अश्व रविवारी दुपारी १ वाजता अकलूज, धवलनगर येथील प्रतापगडावरुन रवाना झाला़
रवाना होण्यापूर्वी पद्मजादेवी मोहिते-पाटील, डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील, उर्वशीराजे मोहिते-पाटील यांनी ‘शौर्य’ची विधिवत पूजा करुन गूळ, हरभरा दाळ, धने, साखरेचा घास भरविला. यावेळी जनसेवेचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव मिसाळ, उपाध्यक्ष आण्णासाहेब इनामदार, संघटक आण्णासाहेब शिंदे, सतीश पालकर, सचिव सुधीर रास्ते, जिल्हाध्यक्ष शिवाजीराव इंगवले, बबनराव शेंडगे, पिंटू वैद्य, राजू निकाळजे, सोहेल खान, मयूर माने, ज्योती कुंभार आदी उपस्थित होते.
देहूच्या तुकाराम महाराज संस्थानने सुमारे ३० वर्षांपूर्वी प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे आषाढी वारी सेवेसाठी पताकाधारी अश्वाची मागणी केली होती. त्यावेळी प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी वारीच्या सेवेसाठी मानाचा पताकाधारी अश्व दिला. त्यांच्या पश्चात पुत्र डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी ही सेवा अखंडित सुरु ठेवली आहे.
२४ जूनपासून देहू ते पंढरपूर सुरु होणाºया आषाढी पायी वारीत सहभागी होण्यासाठी शौर्यला वारीच्या सेवेसाठी रवाना करण्यात आले.
लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी मारवाड जातीचे अश्व योग्य असते. शौर्य अश्व मारवाड जातीचे आहे. ते शुभ लक्षणी व गुण लक्षणी असे अश्व आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये मानाचा पताकाधारी स्वार असलेला शौर्य अश्व भक्तिमय वातावरणात रिंगण धावतो तेव्हा आध्यात्मिक समाधान प्राप्त होते.
- डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील
३० वर्षांपूर्वी प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी देहू संस्थानने केलेल्या मागणीप्रमाणे अश्व वारीसेवेसाठी देऊ केला होता. आध्यात्मिक क्षेत्रात आमच्या अश्वाला सेवेचा मान मिळतो, ही मोठी भाग्याची व समाधानाची बाब आहे़ साहेबांच्यानंतरही वारीसाठी अश्वाची सेवा अखंडितपणे सुरु ठेवली आहे. पुढेसुद्धा ही सेवा कायम राहील.
- पद्मजादेवी मोहिते-पाटील