‘प्रवरा’ने सामाजिक बांधिलकी जपली
By admin | Published: August 11, 2014 03:06 AM2014-08-11T03:06:56+5:302014-08-11T03:06:56+5:30
सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागात उभ्या राहिलेल्या ‘प्रवरा मॉडेल’ने सामाजिक वातावरण टिकवण्यास हातभार लावला आहे.
बाभळेश्वर (जि. अहमदनगर) : सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागात उभ्या राहिलेल्या ‘प्रवरा मॉडेल’ने सामाजिक वातावरण टिकवण्यास हातभार लावला आहे. साहित्यिकांबरोबरच राज्य सरकारनेही सामाजिक बांधिलकीतून घेतलेल्या निर्णयामुळे सजग सामाजिक, सांस्कृतिक वातावरणाची परंपरा टिकवून ठेवण्यात यश आले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव
विखे पाटील यांच्या ११४व्या जयंतीनिमित्त साहित्य आणि कला गौरव पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. फ. मु. शिंदे अध्यक्षस्थानी होते. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्यमंत्री सुरेश धस आदी कार्यक्रमाला उपस्थित होते.
पद्मश्री विखे पाटील यांच्या नावाने देण्यात येणारा साहित्यसेवा जीवनगौरव पुरस्कार डॉ. म. सु. पाटील यांना, तर कलागौरव पुरस्कार मोमिन कौठेकर यांना प्रदान करण्यात आला. राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार भारत सासणे, समाजप्रबोधन
पुरस्कार महामंडलेश्वर डॉ. रामकृष्णदास लहवीतकर, प्रवरा परिसर उत्कृष्ट साहित्य पुरस्कार सुदर्शन दहातोंडे, नाट्यसेवा पुरस्कार अनिल क्षीरसागर यांना मुख्यमंत्री चव्हाण आणि फ. मु. शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
डॉ. बाळासाहेब विखे म्हणाले, जिरायती भागासाठी वरदान असलेल्या निळवंडे प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घेऊन दिलासा
द्यावा. पाऊस नसल्याने खरीप पीक वाया गेले असून, रब्बीची पेरणी अनेक ठिकाणी झालेली नसल्याने
दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली. फ. मु. शिंदे यांनी एकमेकांचे दु:ख वाहून घेणे हा साहित्याचा धर्म असल्याचे
सांगत कवितेच्या माध्यमातून राजकारणी व समाजकारण्यांचे त्यांनी मार्मिक विवेचन केले. (वार्ताहर)