साताऱ्यात पावसांन अवकळा..--(लोकमत टीम)

By Admin | Published: March 1, 2015 11:09 PM2015-03-01T23:09:32+5:302015-03-01T23:13:53+5:30

उभी पिके झाली --पुरती भुईसपाट ! --हळद रुसली; --स्ट्रॉबेरी फसली ! --अवघ्या एका रात्रीत --वीटभट्ट्या पाण्यात! --आंब्याचा मोहोर झडला; द्राक्ष, डाळिंबं उद्ध्वस्त !

Pravasan Avalal in Satara ..-- (Lokmat Team) | साताऱ्यात पावसांन अवकळा..--(लोकमत टीम)

साताऱ्यात पावसांन अवकळा..--(लोकमत टीम)

googlenewsNext

सातारा : अवघ्या काही दिवसांपूर्वी होता थंडीचा प्रचंड कहर. त्याचा फायदा गहू, ज्वारीला होऊन पिकेही होती जोमात. कधी नव्हे ती यंदा आंब्याची झाडेही भलतीच लगडून गेली होती मोहोरानं... मात्र नभानं भुईला दान देण्याऐवजी नभातून एखाद्या वैऱ्याप्रमाणं कोसळल्या आकाशसरी अन् उद्ध्वस्त केलं धान्यानं भरलेलं सारं शिवार. उतावळा झालेल्या नभांनी अवेळी सांडून कष्टानं पोसलेली पिकं जमीनदोस्त केली. उघड्या डोळ्यांनी शिवारं उद्ध्वस्त होताना पाहून शेतकऱ्यांनी बांधावर बसून ढसाढसा अश्रू ढाळले. पावसाला सुरुवात होताच काढून झालेली किंवा काढण्याच्या अवस्थेत रानभर पसरलेली पिके वाया जाताना पाहण्याशिवाय शेतकऱ्यांकडे काहीही पर्याय नव्हता. स्ट्रॉबेरी, ऊस, टोमॅटो, आलं, ज्वारी, गहू सगळंच धुवून गेलं. विटाच्या भट्ट्या या पावसानं अक्षरश: उद्ध्वस्त केल्या. आता अधिकाऱ्यांनी पाहावं उघड्या डोळ्यांनी अन् करावा नुकसानीचा पंचनामा. तोंडचा घास गेला. आता शासनानं तरी मदत करावी, एवढीच आहे अपेक्षा अश्रू ढाळणाऱ्या शेतकऱ्यांची. (लोकमत टीम)


डोळा आले पाणी : जिल्ह्यात दोन दिवस पावसाचे थैमान घातले. पावसाचा कहर एवढा की त्यात सारं सारं वाहून गेलं. कष्टानं पोसलेली पिकं जमीनदोस्त झाली. जिवापेक्षा जास्त जपलेली पिकं मातीमोल होताना उघड्या डोळ्यांनी पाहताना शेतकऱ्यांचे डोळे पाणावले होते.

चिखलाचा राडा अन् पोटावर पाय..
काशिळ/म्हसवड/पाटण : अवकाळीमुळे काशीळसह परिसरात ज्वारी व गव्हाची पीके भुईसपाट झाली आहे. याठिकाणी शनिवारपासून पावसाला सुरूवात झाली. पाण्यामुळे शेतात काढून टाकलेला कडबा पूर्णपणे भिजला असून उसतोडणीचे कामे पूर्णपणे ठप झाली आहेत. तसेच पावसामुळे परिसरातील वीटभट्ट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
माण तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने सर्वत्र पाणी-पाणी केले असून वीटभट्ट्या व्यावसायिकांना याचा चांगलाच फटका बसला आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून तालुक्याच्या सर्व विभागांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत होण्याबरोबरच ज्वारी, मका, हरभरा या पिकांना फटका बसला आहे. थंडीची लाट आल्यामुळे पाटण तालुका चांगलाच गारठला.
कोयना व चांदोली अभयारण्यात दिवसभर पाऊस पडत होता. कऱ्हाड-चिपळूण रस्त्यावर पाणी साचले होते.
वीटभट्ट्यांची माती, भट्टीला लावलेल्या विटांचे मोठे नुकसान झाले. काही व्यावसायिकांनी प्लास्टिकच्या कागदाने वीटभट्ट्या झाकून ठेवल्या आहेत. जोरदार पावसामुळे वाहतूकही विस्कळीत झाली होती.


तोंडाशी आलेला घास गायब
औंध/खटाव : औंध परिसराला अवकाळी पावसाने झोडपून काढले. पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून भरपाई देण्याची मागणी होत आहे.
रब्बी हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्यामुळे वर्षभर खायचे काय, या चिंतेने शेतकरी भिजलेल्या पिकांकडे पाहत बांधावर उभे आहेत. औंध, लांडेवाडी, त्रिमली, गोपूज, पळशी, चौकीचा आंबा या भागात शेतीचे मोठे नुकसान झाले.
खटाव परिसरातीलअवकाळी पावसामुळे रस्त्यांवरून पाणी वाहिले. हातातोंडाशी आलेल्या रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले तर वातावरणात झालेल्या बदलामुळे आंबा, द्राक्ष बागांवरही परिणाम झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.


पावसानं केला रं इस्कोट..
भुर्इंज : हळद काढून झाली. शिजवूनही झाली. वाळवण सुरु होते. तेही काम बऱ्यापैकी झाले होते. हळद उद्या व्यापाऱ्याला द्यायची होती आणि आज पावसाने सारा इस्कोट केला. मी, माझी पत्नी व माझा मुलगा असे आम्ही तिघे शनिवारी रानात होतो. वावरभर पसरलेले हळदीचे पीक पाहून उद्याची स्वप्ने रंगवत होतो. पण अचानकपणे आलेल्या पावसाने त्या साऱ्याच स्वप्नांचा चक्काचूर केला. दोन तीन एकरात रानात पसरलेल्या हळदीला झाकण्यासाठी ठिगळं लावायची ती कुठली? असा उद्विग्न सवाल येथील प्रगतशील शेतकरी दत्तात्रय भोसले पाटील यांनी उपस्थित करुन हळहळ व्यक्त केली.
शनिवारी संध्याकाळी सुरु झालेल्या पावसाने रात्रभर थैमान घातले. यात एकट्या हळदीबरोबरच ज्वारी, गव्हाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषत: वाई तालुक्याच्या पूर्व भागात ज्वारी व गहू काढून झाला होता. तो घरी नेण्याच्या तयारीत असतानाच पावसाने घाला घातला. एखाद्या वैऱ्यासारख्या अचानकपणे आलेल्या या पावसाने या सर्व पिकांची नासाडी केली आहे.

डाळिंबाची फुलं गळाली तर द्राक्ष मणुक्याच्या चिंचुक्या झाल्या
म्हसवड : कधी पाऊस नसल्याने दुष्काळी परिस्थिती तर कधी पावसामुळे पिकांचे नुकसान यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. बेदाना तयार करण्यासाठी शेडवर टाकण्यात आलेली द्राक्षे भिजून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. माण तालुक्यात पावसाची रिमझिम सुरूच असून यामुळे रब्बी हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. डाळिंबाच्या बागेत पावसामुळे फुले गळून गेली आहेत. तर उभा गहू भुईसपाट झाला आहे.
पिंपोडे-बु्रदुक : पिंपोडे बु्रदुकसह परिसरात शनिवारी चार वाजेपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली असून रविवारी दिवसभर संततधार सुरू होती. या पावसामुळे ज्वारी, गहू या रब्बी पिकांसह डाळींब व द्राक्षे या नगदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे द्राक्षांच्या मण्यांना तडे गेले आहे. त्यामुळे बुरशीजन्य रोगाचे सावट निर्माण झाले आहे. फळ तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते...

उसाच्या चिपाडाचं
पूर्णपणे ‘चिपाड’
कोपर्डे हवेली : परिसरात पावसाने गहू, शाळू, टोमॅटो आदी पिकांचे नुकसान झाले. तसेच ऊसतोडणी लांबणीवर पडली. परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ज्वारी पिकांची काढणी सुरू असतानाच पाऊस पडल्याने शाळू पीक व त्याचा कडबा भिजून गेला आहे. तर गहू पीक पावसामुळे भुईसपाट झाले आहे. सध्या ऊसतोडणी गळीत हंगाम सुरू आहे. त्यामध्येच पाऊस पडल्याने ऊसतोडणी लांबणीवर पडली आहे. तर गुऱ्हाळ गृहातील चिपाडे भिजल्याने गुऱ्हाळगृह बंद ठेवण्यात आली आहेत. सह्याद्री साखर कारखान्यावर असणाऱ्या ऊसतोडणी मजुरांची पावसामुळे साहित्य भिजले.

लालचुटूक स्ट्रॉबेरी लोळली चिखलात !
लाखोंचे नुकसान : महाबळेश्वर, पाचगणी परिसरात अवकाळीचा फटका
वाई/महाबळेश्वर/पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यात शनिवारपासून मुसळधारपणे कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरी पीक पाण्याखाली गेले आहे. आगोदच स्ट्रॉबेरी उत्पादकांचे कंबरडे मोडले असतानाच आता तोडणीस आलेली फळे पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अवकाळीने स्ट्रॉबेरीसह गहू , हरभरा, शाळू या पिकांनाही झोडपुन काढले आहे
महाबळेश्वर तालुक्यातील भोसे, भिलार, पांगारी, गुरेघर, भोसे, राजपुरी, खिंगर, बोंडारवाडी ,घोटेघर, हरोशी, उचाट या गावांमधील स्ट्रॉबेरी उत्पानक शेतकऱ्यांना अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांची स्ट्रॉबेरी शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरीची तोडणीसाठी आलेलीफळे पुर्णपणे वाया गेली आहेत. हा पाऊस असाच काही काळ राहल्यास मोठ्या नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणार आहे. या पावसामुळे मेटगुताड, बोंडारवाडी, अवकाळी, तळदेव, तापोळा या भागात स्ट्रॉबेरीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. तालुक्यात सुमारे साठ ते सत्तर टक्के स्ट्रॉबेरीचे नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसाने वाई तालुक्यात ज्वारी, गहू पिकाचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी ज्वारी काढून शेतात पडलेली आहे तर गव्हाचे पीक पावसाने झोपविले आहे. स्ट्रॉबेरीला माती लागून मोठे नुकसान झाले आहे. काढलेली ज्वारी काळी पडण्याची भीती व्यक्त होत आहे.


हळद पावसानं तर डोळे अश्रूनं भिजले
कऱ्हाड/मलकापूर : दुष्काळी भागासह कृष्णा, कोयना नदीकाठावरील गहू, हरभरा, शाळू, हळद या प्रमुख पिकांसह इतर पिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला असून, शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
कऱ्हाड तालुक्यात प्रामुख्याने ऊस पिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून ऊसदर अनिश्चित असल्याने अनेक शेतकऱ्यांचा उसाऐवजी इतर पिके घेण्याकडे कल वाढला आहे. महागडे वीजबिल, पाण्याचा तुटवडा याचा मेळ घातला, कशी-बशी इतर पिके जोपासली जात आहेत. मात्र, दोन दिवसांत पडलेल्या संततधार पावसाने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जनतेच्या पोषणकर्त्या शेतकऱ्यांवरच चारी बाजूंनी संकटांचा सपाटा सुरू असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत तालुक्यात पावसाची संततधार सुरूच होती. पावसाचा तडाखा टोमॅटोच्या बागांना बसला. पावसामुळष मातीच्या कच्च्या विटाही भिजल्यामुळे या ठिकाणच्या वीटभट्टीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Web Title: Pravasan Avalal in Satara ..-- (Lokmat Team)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.