प्रवीण छेडांच्या घरवापसीने सोमय्यांची उमेदवारी धोक्यात  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 07:12 AM2019-03-23T07:12:26+5:302019-03-23T07:12:46+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक आणि पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी शुक्रवारी भाजपात प्रवेश केला.

Praveen Chadha's family threatens to nominate Somaye | प्रवीण छेडांच्या घरवापसीने सोमय्यांची उमेदवारी धोक्यात  

प्रवीण छेडांच्या घरवापसीने सोमय्यांची उमेदवारी धोक्यात  

Next

मुंबई  - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक आणि पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी शुक्रवारी भाजपात प्रवेश केला. निवडणुकीच्या तोंडावर छेडा यांच्या घरवापसीमुळे मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातील विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांची उमेदवारी धोक्यात आल्याची चर्चा आहे. भाजपाने आपल्या पहिल्या यादीत सोमय्यांना स्थान दिलेले नाही.
गुजराती समाजातील वजनदार नेते म्हणून ओळख असणाऱ्या प्रवीण छेडा यांनी भाजपातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. याबाबत छेडा म्हणाले की, संघपरिवारातूनच माझी वाटचाल सुरू झाली. तीन वेळा नगरसेवक म्हणून काम केले. काँग्रेसकडून उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे तिकीट मिळत होते. ती उमेदवारी सोडून मी भाजपात दाखल झालो आहे. माझ्या परिवारात परत आलो आहे.
छेडा यांच्या आजच्या भाजपा प्रवेशामुळे किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भाजपा नेतृत्वाकडून सोमय्या यांच्या पर्यायाचा शोध सुरू असल्याची चर्चा आहे. सोमय्या यांच्याऐवजी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, मनोज कोटक आदींच्या नावांचीही चाचपणी पक्षश्रेष्ठींकडून करण्यात आल्याचे समजते. त्यातच छेडांच्या भाजपा प्रवेशाने सोमय्यांच्या जागी छेडांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.
भाजपा नगरसेवक म्हणून कारकिर्द गाजविणाऱ्या छेडा यांनी प्रकाश मेहता यांच्यासोबतच्या वादामुळे २०१२ साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २०१२ साली काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्यावर त्यांनी पालिकेत
विरोधी पक्षनेते पदही भूषविले.
२०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत प्रकाश मेहतांकडून त्यांचा
पराभव झाला होता. २०१७ मध्ये पालिका निवडणुकीत भाजपाच्या पराग शहांनी त्यांना पराभूत केले
होते. प्रकाश मेहतांना शह
देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना भाजपामध्ये घेतल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Praveen Chadha's family threatens to nominate Somaye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.