राज्यात पुन्हा गँगवॉर होण्याची भीती: प्रवीण दरेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 05:00 PM2019-12-19T17:00:32+5:302019-12-19T17:02:58+5:30
नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर झालेल्या गोळीबाराचे तीव्र पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत उमटल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबई: नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर झालेल्या गोळीबाराचे तीव्र पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत उमटल्याचे पाहायला मिळत आहे. तर विरोधकांनी याच मुद्यावरून सरकारवर निशाणा साधला. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सुद्धा सरकारवर टीका केली. नागपूर आणि मुंबईत खुलेआम गोळीबार करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा गँगवॉर होण्याची भीती असल्याचे प्रवीण दरेकर म्हणाले.
नागपुरचे महापौर संदीप जोशी यांच्या झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर आज तिसऱ्या दिवशी मुंबईत शिवेसनेचे विक्रोळीतील उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडली आहे. त्यामुळे विरोधकांनी राज्यातातील कायदा व सुव्यवस्था विषयी प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.
नागपूर शहरात अधिवेशन सुरू असताना पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. या पार्श्वभूमीवर अशाप्रकारचा हल्ला होत असेल तर ही चिंतेची बाब आहे. या घटनेने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर राज्यातील परिस्थिती पाहता पुन्हा गँगवॉर होण्याची भीती असल्याचे सुद्धा प्रवीण दरेकर म्हणाले.
राज्यात खुलेआमपणे गोळीबाराच्या घटना घडत असताना सरकार ढिम्मपणे पाहतंय पण कारवाई करत नसल्याचे आरोप दरेकर यांनी केले. तर हे राज्य कायद्याचे राज्य आहे का? असा प्रश्न सुद्धा त्यांनी यावेळी उपस्थित केला.