प्रवीण दीक्षित यांना तीन महिन्यांची मुदतवाढ ?

By admin | Published: July 21, 2016 05:35 AM2016-07-21T05:35:31+5:302016-07-21T05:35:31+5:30

महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख प्रवीण दीक्षित यांना तीन महिन्यांचा कार्यकाळ वाढवून मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

Praveen Dixit gets three months extension? | प्रवीण दीक्षित यांना तीन महिन्यांची मुदतवाढ ?

प्रवीण दीक्षित यांना तीन महिन्यांची मुदतवाढ ?

Next

जमीर काझी,

मुंबई- राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरून पावसाळी अधिवेशनात खडाजंगी सुरू असताना, महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख प्रवीण दीक्षित यांना तीन महिन्यांचा कार्यकाळ वाढवून मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. पुढच्या आठवड्यात त्याबाबत औपचारिक घोषणा केली जाईल, असे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, या महिन्याअखेरीस अप्पर महासंचालक व महावितरण कंपनीचे संचालक (दक्षता) सूर्यप्रताप गुप्ता हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे ‘एडीजी’चे आणखी एक पद रिकामे होणार आहे. सध्या कायदा व सुव्यवस्था व आस्थापना या महत्त्वाच्या विभागांबरोबरच या दर्जाची तीन पदे रिक्त आहेत. तर पुढील महिन्यात ‘एफएसएल’चे डीजी प्रभात रंजन निवृत्त होत आहेत.
प्रवीण दीक्षित हे १९७७ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असून ३० सप्टेंबर २०१५ ला त्यांनी तत्कालिन प्रमुख संजीव दयाल यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे. गेल्या १० महिन्यांत त्यांनी ‘पोलीसमित्र’ ही संकल्पना राज्यात राबविली. त्याद्वारे पोलिसांवरील बंदोबस्ताचा वाढता ताण कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचप्रमाणे महिलांविरोधातील गुन्हे, सोनसाखळी चोरीच्या तक्रारींसाठी मोबाइलवर अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे. गृहखात्याची जबाबदारी सांभाळत असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू अधिकारी म्हणून त्यांची खात्यात ओळख आहे. यापूर्वी त्यांनी एसीबीत असताना माजी मंत्री अजित पवार, छगन भुजबळ व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा सहभाग असलेल्या महाराष्ट्र सदन घोटाळा व पाटबंधारे विभागातील घोटाळ्याच्या चौकशीची प्रकरणे मोठ्या कौशल्याने हाताळली होती. त्याचप्रमाणे सरकारी व निमसरकारी सेवेतील भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध मोहीम राबवित लाचखोरांना सापळ््यात पकडण्याचे प्रमाण कित्येक पटींनी वाढविले. दीक्षित ३१ जुलैला सेवानिवृत्त होत आहेत. मात्र, त्यांनी आणखी काही काळ हे पद सांभाळावे, अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा असून, दीक्षितही त्यासाठी तयार आहेत. त्यामुळे त्यांची तीन महिन्यांची मुदतवाढ निश्चित असल्याचे गृहविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
हे अधिकारी शर्यतीत
सेवाज्येष्ठतेच्या आधारावर पहिल्या तीन अधिकाऱ्यांपैकी एकाची पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती होऊ शकते. १९८१ च्या आयपीएसच्या बॅचचे अधिकारी एसीबीचे प्रमुख सतीश माथूर, राकेश मारिया व मीरा बोरवणकर हे सेवाज्येष्ठ अधिकारी आहेत. यापैकी बोरवणकर या नुकत्याच केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेल्या आहेत, तर मारिया यांच्याविषयीची राज्य सरकारची ‘वक्र ’ दृष्टी अद्यापही कायम आहे. शिवाय ते पुढील वर्षी ३१ जानेवारीला निवृत्त होत आहेत. त्यामुळे दीक्षित यांच्यानंतर माथूर यांची डीजी म्हणून नियुक्ती निश्चित मानली जात आहे. ते ३१ मे २०१८ रोजी निवृत्त होणार असल्याने त्यांना पुरेसा कालावधी देखील मिळेल. त्यानंतर, ज्येष्ठतेच्या आधारावर मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती केली जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. पडसलगीकर ३१ आॅगस्ट २०१८ ला तर पोलीस गृहनिर्माण विभागाचे प्रमुख व्ही. डी. मिश्रा ३१ मे २०१८ ला निवृत्त होणार आहेत.
>अशी मिळणार मुदतवाढ...
पोलीस महासंचालकांच्या सेवानिवृत्तीनंतर आवश्यकता वाटल्यास पहिल्या टप्प्यातील मुदतवाढ राज्य सरकार स्वत:च्या अधिकारात करू शकते, तर त्यानंतर पुढील तीन महिन्यांचा कालावधी हवा असल्यास केंद्रीय गृह मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवून मंजुरी घ्यावी लागते. त्याचप्रमाणे, त्यामागील विशेष कारण नमूद करावे लागते. त्यामुळे प्रवीण दीक्षित यांना तीन महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: Praveen Dixit gets three months extension?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.