माढ्यातून प्रवीण गायकवाड लढणार? शरद पवार यांची नवी खेळी!
By पोपट केशव पवार | Published: April 1, 2024 10:54 AM2024-04-01T10:54:24+5:302024-04-01T10:57:26+5:30
Lok Sabha Election 2024 : रविवारी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी यावर खलबते होऊन गायकवाड यांना तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर : भाजपवर नाराज असलेले धैर्यशील मोहिते-पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यासाठी अद्यापही राजी नसल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून या मतदारसंघातून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवार यांचे विश्वासू प्रवीण गायकवाड यांना मैदानात उतरवण्याची नवी खेळी खेळली जात आहे.
रविवारी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी यावर खलबते होऊन गायकवाड यांना तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे माढा मतदारसंघात प्रवीण गायकवाड विरुद्ध भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, या उमेदवारीला विरोध करत अकलूजच्या मोहिते-पाटील यांनी कडाडून विरोध करत बंडाचे हत्यार उपसले आहे. यातूनच मोहिते-पाटील हे शरद पवार गटाच्या गळाला लागले होते.
यासाठी तुतारी हातात घेण्याची तयारीही त्यांनी चालविली होती. पण, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी गेल्या दोन दिवसांत सलगपणे मोहिते-पाटील परिवारातील सदस्यांच्या भेटी घेत त्यांचे मतपरिवर्तन केल्याचे समजते. त्यामुळे ऐनवेळी महाविकास आघाडीकडून लढण्यासाठी शरद पवार यांनी त्यांचे विश्वासू सहकारी प्रवीण गायकवाड यांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. रविवारी पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत यावर सखोल चर्चा करण्यात आली. स्वत: गायकवाड यांनीही लढण्यास सहमती दर्शविली आहे. गायकवाड हे पुण्यातील असले तरी त्यांची माळशिरस तालुक्यात शेती, घर आहे. त्यामुळे या मतदारसंघाशी त्यांचा चांगला जनसंपर्कही आहे. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून त्यांनी तरुणांना उद्यमशील बनवण्यासाठी मोठी चळवळ सुरु केली आहे.
मोहिते पाटील यांचे या मतदारसंघात मोठे काम आहे. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीकडून लढावे ही आमची इच्छा आहे. मात्र, ते लढणार नसतील तर मी निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. तशी इच्छा मी शरद पवार यांना भेटून कळवली आहे - प्रवीण गायकवाड, इच्छुक उमेदवार, माढा लोकसभा मतदारसंघ.