प्रवीण महाजनांचा मृत्यू नैसर्गिक नाही, मलाही जीवे मारण्याची धमकी - सारंगी महाजन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2017 07:27 PM2017-12-02T19:27:36+5:302017-12-02T19:29:18+5:30
प्रवीण महाजन यांचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला नसल्याचा खळबळजनक दावा त्यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी शनिवारी उस्मानाबाद येथे एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला.
उस्मानाबाद - प्रवीण महाजन यांचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला नसल्याचा खळबळजनक दावा त्यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी शनिवारी उस्मानाबाद येथे एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला. महाजन कुटूंबियांच्या उस्मानाबाद येथील वडिलोपार्जित जमिनीतील हिश्श्यावरुन सारंगी महाजन व महाजन कुटुंबियातील वाद जिल्हा न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. त्याच्या तारखेसाठी शनिवारी सारंगी महाजन उस्मानाबाद येथे आल्या होत्या.
त्यावेळी एका वृत्तवाहिनीस दिलेल्या मुलाखतीत त्यांनी गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या, महाजन कुटूंबाची वारसा हक्काने मिळणारी जमीन आपल्याला मिळू नये यासाठी मला सहा वर्षांपासून चकरा मारायला लावल्या जात आहेत. मला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.
माझ्यावर दडपण आणण्यासाठी न्यायालयाच्या तारखेला समोरून गाडीभरून गुंड आणले जातात. हे काम एक स्वीयसहाय्यक करतो, असा आरोप सारंगी महाजन यांनी केला. पतीचा मृत्यू या सर्व विषयावर पुस्तक लिहिणार आहे. प्रविण यांच्या मृत्यूसंदर्भात मानवाधिकार आयोगाकडेही दाद मागितली होती. त्यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता़ परंतु, त्याबद्दल मी आज कोणाचे नाव घेणार नाही. दरम्यान, मंत्रालयाकडून देय असलेले ७ लाखांचे बिलही अद्याप मिळाले नाही. सध्याच्या सरकारकडून तर ती अपेक्षाच करू शकत नाही, असाही आरोप त्यांनी केला.
अकारण वाद : प्रकाश महाजन
जे आता हयातीत नाहीत, त्यांच्याविषयी आता अकारण वाद उकरुन काढले जात आहेत़ हिश्श्याचा वाद मिटविण्याची तयारी होती. परंतु, सारंगी यांनाच ते करायचे नव्हते. घाणेरडे आरोप केले आहेत, ज्यात काहीही तथ्य नाही, असे स्पष्ट करीत दिवंगत प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी सारंगी महाजन यांचे म्हणणे फेटाळून लावले.