Pravin Darekar:'तेव्हा लोक रक्ताच्या थारोळ्यात पडले होते; आता कुठे गेला ठाकरी बाणा?', प्रवीण दरेकरांचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 02:15 PM2022-03-09T14:15:53+5:302022-03-09T14:20:50+5:30
'आम्ही नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. '
मुंबई:नवाब मलिकांच्या (nawab malik) राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाले आहे. काल विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ बॉम्ब टाकला. त्यानंतर आज मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून मुंबईतील आझाद मैदानात सरकारविरोधात विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाला भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनीही सरकारवर जोरदार निशाणा साधला.
'कुठे गेला ठाकरी बाणा?'
गुन्हेगारांशी संबंध असलेल्या व्यक्तीला तुम्ही पाठिशी घालता. कुठे गेला तुमचा ठाकरी बाणा? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चिरंजीवाला माझा सवाल आहे. देशद्रोह्यांना मदत करणाऱ्या मंत्र्यासाठी सरकारचे नेते महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलन करतात. गृहमंत्रीही या पुतळ्याखाली आंदोलनाला बसतात. त्या ठिकाणी महात्मा गांधी असते तर तुम्हाला फासावर लटकवल्याशिवाय राहिले नसते, अशी घणाघाती टीका प्रवीण दरेकर यांनी यावेळी केली.
'देशद्र्योसाठी सरकारचे आंदोलन'
या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला पाझर फुटत नाही. बॉम्बस्फोटात लोक रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, यांना त्याचीही लाज वाटत नाही. पण आम्ही नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मलिकांचा राजीनामा घेण्यासाठीच आज लाखोंचा जनसागर लोटलाय. देशद्र्योसाठी सरकारमधील नेते महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलन करतात, गृहमंत्रीही बसतात. आज गांधी असते तर तुम्हाला फासावर लटकवल्याशिवाय राहिले नसते, असं दरेकर म्हणाले.
'फडणवीसांना कुणीही संपवू शकत नाही'
देवेंद्र फडणवीसांना संपवण्याचा कट सुरू आहे. पण, काल देवेंद्रजींनी तुमचे कपडे उतरवले, तुमचे षडयंत्र फडणवीसांनी उघड केले. पुराव्यासहीत सर्व आरोप सिद्ध केले. फडणवीसांना कोणीही संपवू शकत नाही. फडणवीस या प्रवृत्ती संपवल्याशिवाय राहणार नाहीत, असं त्यांनी सांगितले. सत्तेला लाथ मारुन बाळासाहेबांचा कित्ता, ठाकरी बाणा उद्धव ठाकरेंनी गिरवावा. जनतेचा एल्गार, संताप एवढा मोठा आहे की तुमचं सरकार खाली आल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.