शिवसेना नेते रामदास कदम म्हणतात, प्रविण दरेकर आलेत माझ्या घरी जेवायला; कुठे बोलू नको!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 07:10 PM2021-10-02T19:10:57+5:302021-10-02T19:18:31+5:30
रामदास कदम यांनीच परब यांच्या विरोधात सोमय्यांना रसद पुरवल्याचा आरोप; राष्ट्रवादी, मनसे नेत्यांचे आरोप
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्यांनी गेल्या काही महिन्यांत शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर सातत्यानं आरोप करून सोमय्यांनी त्यांना वारंवार अडचणीत आलं आहे. परब यांच्यावर तुटून पडलेल्या सोमय्यांना शिवसेनेच्याच बड्या नेत्याने रसद पुरवल्याचा आरोप आता राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. याशिवाय मनसेच्या नेत्यानं सोमय्या आणि कदम यांच्या ऑडिओ क्लिपदेखील समोर आणल्या आहेत.
प्रसाद कर्वे नावाचा एक माहिती अधिकार कार्यकर्ता परब यांच्याविरोधात किरीट सोमय्यांना सगळी माहिती पुरवतो, कारवाईसाठी पाठपुरावा करतो आणि मग हाच कार्यकर्ता सगळ्या अपडेट्स शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांना पुरवतो, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी केला आहे. संजय कदम यांचे आरोप रामदास कदम यांनी फेटाळले आहेत.
दरेकर घरी आलेत, कोणाला बोलू नको- कदम
प्रसाद कर्वे-किरीट सोमय्या आणि प्रसाद कर्वे-रामदास कदम यांच्या अनेक ऑडिओ क्लिप मनसेनं समोर आणल्या आहेत. कर्वे आणि कदम यांच्या एका फोन संभाषणात प्रविण दरेकरांचा उल्लेख आहे. यामध्ये कर्वे एका वरिष्ठ पत्रकारानं त्याच्या यूट्यूब चॅनलवर केलेल्या विश्लेषणाची माहिती कर्वे कदमांना देतात. त्यावर यूट्यूब व्हिडीओची लिंक पाठव. मी नंतर बघतो, असं कदम यांनी कर्वेंना सांगितलं. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आता घरी जेवायला आले आहेत. याबद्दल कुठे बोलू नकोस, असं कदमांनी कर्वेंना सांगितलं.
ती ऑडिओ क्लिप खोटी; अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार- कदम
मनसेच्या वैभव खेडेकरांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत. त्यात कोणतंही तथ्य नाही, असं म्हणत कदमांनी आरोप फेटाळून लावले. माझ्या मुलाविरुद्ध विधानसभा निवडणुकीत संजय कदम पराभूत झाले. तेव्हापासून ते सातत्यानं माझ्यावर आरोप करत आहेत. वैभव खेडेकरांच भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं मी बाहेर काढली. त्यामुळे माझी बदनामी करण्यासाठी ते असे आरोप करतात. मी आधीच त्यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे आणि आता पुन्हा मानहानीचा दावा करणार आहे, असं कदम म्हणाले.