राऊतांच्या 'फोटोबॉम्ब'ला उत्तर, बावनकुळे तिथं नक्की काय करत होते? भाजपकडून नवे फोटो शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 05:27 PM2023-11-20T17:27:08+5:302023-11-20T17:41:45+5:30

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका फोटोवरून भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षांमध्ये जोरदार राजकीय कलगीतुरा रंगू लागला आहे.

Pravin Darekar reaction on Shivsena sanjay raut alligation on BJP state president Chandrashekhar Bawankule | राऊतांच्या 'फोटोबॉम्ब'ला उत्तर, बावनकुळे तिथं नक्की काय करत होते? भाजपकडून नवे फोटो शेअर

राऊतांच्या 'फोटोबॉम्ब'ला उत्तर, बावनकुळे तिथं नक्की काय करत होते? भाजपकडून नवे फोटो शेअर

मुंबई - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज 'एक्स'वर एक फोटो शेअर करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा परदेशातील एक फोटो पोस्ट करत ते जुगार खेळत असल्याचा दावा केला. "महाराष्ट्र पेटलेला आहे आणि हे महाशय मकाऊ येथे कसिनोत जुगार खेळत आहेत. फोटो झूम करुन पाहा, ते तेच आहेत ना?" असा सवाल राऊत यांनी विचारला. संजय राऊतांच्या या पोस्टने राजकीय वातावरण तापू लागल्यानंतर आता भाजपकडून आमदार प्रवीण दरेकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

"भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होते, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राउंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आहे आणि त्याच्याच शेजारी हा कसिनो आहे. या परिसरात बावनकुळेजी कुटुंबासह होते. त्यावेळी कुणीतरी काढलेला हा फोटो आहे. केवळ बदनामी करण्याच्या हेतूने हा फोटो घेतलेला आहे. त्यांच्या शेजारी त्यांच्या कुटुंबातील सदस्य देखील बसले होते. मात्र जाणीवपूर्वक फक्त एकट्या बावनकुळे साहेबांचा फोटो टाकला," असा दावा प्रवीण दरेकर यांनी केला आहे. तसंच दरेकर यांनी बावनकुळे यांचे कुटुंबासोबतचे काही फोटोही शेअर केले आहेत.

भाजपच्या स्पष्टीकरणानंतरही राऊतांचा हल्लाबोल सुरूच!

भाजपच्या विविध नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण देण्यास सुरुवात केल्यानंतर, 'जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल' असं म्हणत संजय राऊत यांनी आपण आरोपावर ठाम असल्याचे सांगितले. "भाजपवाले म्हणतात की, ते फॅमिलीसह मकाऊला गेले आहेत...जाऊ द्या...पण त्यांची सोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का? ते म्हणे, कधीच जुगार खेळले नाहीत. मग ते नक्की काय करीत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का? जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल. झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय?" असा खरपूस सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

"माझ्याकडे आणखी बरेच फोटो"

संजय राऊत निराधार आरोप करत असल्याचा दावा भाजपकडून केला जाऊ लागल्यानंतर राऊत आणखीनच आक्रमक झाले आहेत. "आम्ही कधीही वैयक्तिक हल्ला केला नाही. पण सुरुवात तुम्ही केली आणि आता अंत आम्ही करू. जानेवारीपर्यंत तुम्हाला कळेल. तुम्ही जास्त आवाज करू नका. आमच्याशी वाद घालू नका. तुम्ही जास्त आवाज केला तर माझ्याकडे एकूण २७ फोटो आणि ५ व्हिडिओ आहेत. तुम्हाला तुमचे दुकान बंद करावे लागेल," असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

Web Title: Pravin Darekar reaction on Shivsena sanjay raut alligation on BJP state president Chandrashekhar Bawankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.