पुन्हा प्रार्थना

By admin | Published: September 18, 2016 04:47 AM2016-09-18T04:47:08+5:302016-09-18T04:47:08+5:30

सालाबादप्रमाणे गणपती आले आणि गेले. लवकर नाही की उशीर नाही, ठरल्याप्रमाणे वेळेत गेले.

Pray again | पुन्हा प्रार्थना

पुन्हा प्रार्थना

Next


सालाबादप्रमाणे गणपती आले आणि गेले. लवकर नाही की उशीर नाही, ठरल्याप्रमाणे वेळेत गेले. उत्सवात उत्साह तर इतका अमाप होता की वाटावं इथे आबादीआबाद आहे. काही चिंता, विवंचना, समस्या नाही... म्हणूनच म्हणायचं बुद्धी दे गणनायका...
सांगायची गोष्ट वेगळीच. अशा वेळी मला फिरोज दस्तुर यांची आठवण येते. त्यांचे गुरू सवाई गंधर्व - रामभाऊ कुंदगोळकर यांच्या स्मरणार्थ त्यांनी आणि भीमसेन जोशींसारख्या शिष्यांनी सवाई गंधर्व महोत्सव सुरू करण्याचं ठरलं. महोत्सवाच्या तिकिटावर सवाई गंधर्वांचा फोटो होताच. कार्यक्रम यशस्वी झाला. मंडपातून लोक परतू लागले. मात्र फिरोज दस्तुर मंडपात पडलेल्या पत्रिका, तिकीट गोळा करत होते. ते पाहून त्यांना विचारलं, पंडितजी हे काय करताय तुम्ही?
‘‘तिकिटावर गुरुजींचा फोटो आहे ना? पायदळी पडलेलं पाहवत नाही मला’’ फिरोज दस्तुर म्हणाले.
गणपती उत्सवात गणपतीच्या प्रतिमा फोटोंची अशीच दुरवस्था असते की नाही?
गणपती उत्सवात स्मरणिका नावाचा जाहिरातीचा जुडगा असतोच असतो. त्या किती वाचाव्या हा प्रश्न गैरलागू. पण लगेच त्या रद्दीच्या दुकानात अस्ताव्यस्त पडलेल्या दिसतात हे तुम्ही-आम्ही गणपतीचे भक्तच करतो ना?
त्याच्याही पुढची गोष्ट गणेश चतुर्थीला मराठी वृत्तपत्रांबरोबर आरतीसंग्रह दिला जातो. सुरुवातीला त्यात नावीन्य वाटलं. पण आता सरसकट वृत्तपत्रांमधून आरतीसंग्रह दिलेले दिसतात. दोन-चार दिवसही दिलेले दिसतात. म्हणजे एक तर वाचकांना आरत्या पाठ तरी नसाव्यात या विश्वासाने हे संग्रह दिलेले असतात? अशा आरतीसंग्रहाचे ढीग लगेचच रद्दीवाल्यांकडे दिसतात. असं म्हटलं की, ‘‘तुम्ही भाबडे आहात अजून’’ असं ऐकायला आलं. असेल तसंही असेल.
पण तरी प्रश्न उरतोय आम्ही खरंच का गणेशभक्त आहोत? हा प्रश्न गणपती उत्सवात पदोपदी पडतो. त्याचं समर्पक उत्तर मात्र कुणीच देत नाही. एक गाव एक गणपती सोड, पण एक वॉर्ड एक गणपती कल्पना पण रुजू शकत नाही. पण गणेशमूर्तीच्या उंचीवर कायद्याने बंधनं येऊनसुद्धा अवाढव्य मूर्तीचा सोस आम्हाला का? सार्वजनिक गणपतीच्या बाबतीत तर कुणाची मूर्ती मोठी याबाबत चुरसच दिसते. पण जेणेकरून मोठ्या मूर्तीचं फॅड कमी होईल, यासाठी काय करावं लागेल... याबाबत खूप लिहिण्यासारखं आहे. पण हा आमचा सार्वजनिक गणेशोत्सव वर्षानुवर्षे त्याच चाकोरीतून साजरा होतो आहे.
यंदा व्हॉट्सअ‍ॅप, स्पीड पोस्ट, कुरियर सेवा असे संवादाचे वेगवेगळे प्रकार आले असले तरी पत्राची जागा या गोष्टी घेऊ शकलेल्या नाहीत. अर्थात नव्या तंत्रज्ञान माध्यमांमुळे त्यावर परिणाम जास्त आहे हे नक्की, तरी पण याबाबत पोस्टमनचे स्थान नक्की मोठे आहे. उन्हातान्हातून प्रत्येक बिल्डिंगमध्ये पत्र पोचविणे मोठे जिकिरीचे काम आहे. एकेकाळी तर दिवसातून दोनदा पत्रपोच असायची. त्या तुलनेत पोस्ट कारभार मंदावत चालला आहे. हे जरी खरं असलं तरी पोस्टमनच्या कष्टाची तुलना कशाशीही करता येणार नाही. अशा पोस्टमनविषयी कृतज्ञता म्हणून गेल्या वर्षी लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आरती करण्याचा मान एका पोस्टमनला देण्यात आला. अर्थात हा एक प्रकारचा गौरव आहे. अशा वेळी ते पोस्टमनसुद्धा भारावून गेले. यात आश्चर्य ते काहीच नाही.
पण त्यानंतर घडलं ते महत्त्वाचं!
आरतीचा मान मिळालेल्या त्या पोस्टमनदादांनी मुंबईच्या राजाचे पोस्ट तिकीट असावे असा मानस व्यक्त केला. विशेष म्हणजे लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे या गोष्टीचा पाठपुरावा केला गेला.
त्यातून मुंबईच्या राजाच्या पोस्ट पाकिटाची निर्मिती कल्पना मंजूर झाली. त्यानुसार पोस्ट पाकिटावर मूर्तिकार दीनानाथ वेलिंग यांनी साकारलेल्या मूर्तीचे छायाचित्र आहे. यासंबंधित वृत्तामधे असेही म्हटले आहे की, पोस्ट पाकिटासाठी लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने २५ हजारांची रॉयल्टी भरली आहे. म्हणजे हे पोस्ट पाकीट भारतीय टपाल खात्यातर्फे वितरित झालेले आहे. या पोस्टमन दादाच्या आग्रहास्तव मंडळ मुंबईच्या राजाचे पोस्ट तिकीटही काढणार आहे, असे वृत्तामध्ये म्हटले आहे. गणपतीचे पोस्ट पाकीट निघणे ही विशेष गोष्ट आहे. अशा प्रकारची पोस्ट तिकिटं-पाकिटं जमा करणारा मोठा वर्ग आहे. हा आंतरराष्ट्रीय छंद आहे. त्यांच्यासाठी तर ही पर्वणीच समजायला हरकत नाही. महत्त्वाचे म्हणजे हे पाकीट सांभाळले जाईल. एरवी गणपतीचे फोटो नंतर इकडे तिकडे पडलेले दिसतात. तो प्रकार टळेल. त्यासाठी ही गोष्ट स्वागतार्ह.
कुणी सांगावं हे लोण आता पसरतही जाईल. तेव्हा शेवटी प्रार्थना एकच. गणपतीच्या फोटोचं पावित्र्य जपण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी बुद्धी दे गणनायका ही प्रार्थना!
-रविप्रकाश कुलकर्णी

Web Title: Pray again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.