पूर्व द्रुतगती महामार्ग २ तास बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 03:59 AM2018-01-04T03:59:43+5:302018-01-04T04:00:13+5:30
महाराष्ट्र बंदचे तीव्र पडसाद गोवंडी-चेंबूर भागांत उमटले. गोवंडी येथे आंदोलकांनी पूर्व द्रुतगती महामार्ग रोखला. शंभर ते सव्वाशे आंदोलकांनी रस्त्यावर उतरत येथून एकही वाहन पुढे जाऊ दिले नाही, याउलट मंगळवारी आंदोलकांनी लक्ष्य केलेल्या सायन-पनवेल मार्गावरील वाहतूक सुरळीत होती.
मुंबई - महाराष्ट्र बंदचे तीव्र पडसाद गोवंडी-चेंबूर भागांत उमटले. गोवंडी येथे आंदोलकांनी पूर्व द्रुतगती महामार्ग रोखला. शंभर ते सव्वाशे आंदोलकांनी रस्त्यावर उतरत येथून एकही वाहन पुढे जाऊ दिले नाही, याउलट मंगळवारी आंदोलकांनी लक्ष्य केलेल्या सायन-पनवेल मार्गावरील वाहतूक सुरळीत होती.
बुधवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास गोवंडी येथे जमाव पूर्व द्रुतगती महामार्गावर उतरला. जमावामध्ये ७-१० वर्षांच्या मुलांची संख्या मोठी होती. जमावाने पुलावर येताना उड्डाणपुलाखाली ठेवलेले बॅरिगेट्स सोबत आणले होते. सदर बॅरिगेट्स द्रुतगती मार्गावर लावून वाहतूक रोखली. नेहमीपेक्षा वाहनांची वर्दळ कमी असल्याने सुरुवातीला मोठी कोंडी झाली नाही, परंतु दुपारी १नंतर द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या.
सकाळी ९च्या सुमारास आणि दुपारी १२ वाजता आंदोलकांनी चेंबूर नाका येथे प्रत्येकी १५ मिनिटे ‘रास्ता रोको’ केला. यामुळे सायन पनवेल मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. उर्वरित दिवसभर या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू होती. दरम्यान, चेंबूर नाक्यावर आंदोलन करणारे आंदोलक चेंबूर परिसरातील प्रत्येक प्रमुख रस्त्यावर वाहतूक रोखूत होते़
महिला व तरुणींचाही सहभाग
गोवंडी व चेंबूरमध्ये ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनांत महिला आणि तरुणींचा मोठा सहभाग होता. प्रामुख्याने गोवंडी येथील पूर्व द्रुतगती महामार्ग रोखण्यात महिला पुढे होत्या. महिला घोषणाबाजी करत पुलावर उतरल्या. रस्त्यावरील वाहतूक नियंत्रणात आणल्यानंतर महिला आंदोलक रस्त्यावर बसल्या. निळे झेंडे, निषेधात्मक फलक हाती घेऊन या महिला घोषणा देत होत्या, तर मुलींनी रस्त्यावरील वाहतूक रोखली होती. रस्त्यावर येणाºया प्रत्येक वाहनास तरुणींसह लहान मुलीही रोखत होत्या.
मुख्यमंत्र्यांनी संयुक्त बैठक घ्यावी
आंबेडकरी जनतेचा रोष पाहता, मुख्यमंत्र्यांनी राज्यातील वातावरण निवळण्यासाठी सर्व आंबेडकरी संघटनांची एक संयुक्त बैठक घेण्याची मागणी भीम क्रांती संघटनेने केली आहे. भीमा कोरेगाव येथील भ्याड हल्ल्यासंदर्भात नेमकी काय कारवाई करणार? यावर मुख्यमंत्र्यांनी संबंधित बैठकीत उजाळा टाकावा. जेणेकरून राज्यात शांतता प्रस्थापित होईल, असे मत संघटनेचे अध्यक्ष राजेश सोनवणे यांनी व्यक्त केले आहे.
आठवले, पासवान यांनी राजीनामा द्यावा!
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि केंद्रीय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री रामविलास पासवान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (खरात)चे अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे.