विक्रमगडमधील आदिवासींची मान्सूनपूर्व खरेदी सुरू
By admin | Published: May 4, 2017 05:30 AM2017-05-04T05:30:46+5:302017-05-04T05:30:46+5:30
पावसाळा महिन्या भरावर आला की विक्रमगड व तालुक्यातील आजूबाजूच्या खेडयापाडयातील आदिवासी व शेतकरी हंगामपूर्व
विक्रमगड : पावसाळा महिन्या भरावर आला की विक्रमगड व तालुक्यातील आजूबाजूच्या खेडयापाडयातील आदिवासी व शेतकरी हंगामपूर्व कामाला लागतो़ त्यामुळे व संततधार पावसामुळे त्याला बाजारहाट (खरेदी) करण्यास वेळच मिळत नाही़. त्यामुळे तो पावसाळयापूर्वीच मसाला, मिरची, हळद, कांदा, बटाटा, कडधान्ये विविध प्रकारची सुकी मच्छी अशा अनेकविध गरजेच्या वस्तूंचा तीन ते चार महिने पुरेल असा साठा करुन ठेवतो़ सध्या अशा खरेदीला येथे सुरुवात झाली आहे. तिलाच या भागतील आदिवासी अगोट म्हणतात़
़प्रत्येक गाव-पाडयांमध्ये भरणा-या आठवडीबाजारात मान्सूनपूर्व खरेंदीसाठी आदिवासी शेतक-यांची झुंबड उडाली आहे. आज महागाईचा भस्मासुर डोक्यावर असतांनाही खरेदीमात्र कर्ज उधार, उसनवार करून केली जाते आहे. कारण पाउस सुरू झाल्यावर येथे चार महिने भाजी आणण्यापासून ते सर्वच गोष्टीकरीता अडचणी निर्माण होतात. पावसाळयात जीवनावश्यक वस्तूंबरोबरच सुक्या मासळीची खरेदीही जोरदार सुरु झाली असल्याने व्यापाराबरोबरच सुक्या मासळी विक्रेत्यांचा धंदा तेजीत आहे़ तिलाच ग्रामीण भागात मावरा असे म्हणतात़
सातपाटी, मुंबई, वसई, केळवे, डहाणू आदी भागातून मावरे विक्रेत्या महिला विक्रमगड व ग्रामीण परिसरातील दादडे, तलवाडा, साखरे, आलोंडा, मलवाडा आदी विविध खेडयापाडयातील आठवडे बाजारात येउन आपले दुकान थाटतात किंवा रोज डोक्यावर टोपले घेवून गावो गावी दारोदार फिरत असल्याने मावरे खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातील मुख्यत्वे आदिवासी ग्राहकांची, महिलांची एकच झुंबड उडत आहे़
पावसाळयात समुद्रातील मासेमारी बंद असल्याने ताजी मासळी बाजारात उपलब्ध होत नाही,व हंगामाच्या कामा व्यतिरिक्त अन्य बाबींसाठी वेळ मिळत नसल्याने मे महिन्यात खवैय्यांचा भर सुक्या मासळीवर असतो. पावसाळयात शेतीच्या कामांची घाई असल्याने बाजारात येवून ताजी मासळी मिळणे शक्य नसते त्यामुळे त्यांचा भर सुक्या मासळीवर असतो. यामध्ये बोंबील, कोलीम, आंबडकाड, बांगडे, सुरमई, बगीसुकट, मांदेली, सुकट, खारे याचा समावेश असतो. पालघर, वसई, सातपाटी, डहाणू, वाणगाव या परिसरातून मोठया प्रमाणात ही मच्छी येत असते.
उन्हाळयात विकली न गेलेली ताजी मासळी मच्छी व्यावसायिक मीठ लावून सुकवतात आणि मे महिन्यात ती विक्रीसाठी आणतात. त्यामुळे विक्रमगडच्या नाक्यावर परिसरात तसेच आजूबाजू साखरा, दादडे, तलवाडा, आलोंडा, मलवाडा, जव्हार परिसरात ही सुकी मासळी सध्या मोठया प्रमाणात विक्रीसाठी येत आहे़ पालघर, वसई, सातपाटी, केळवे, डहाणू येथून सुकी मासळी घेवून आलेल्या महिला बाजारात सुकी मच्छी विकत आहेत़ तसेच स्थानिक कोळी महिलाही गावात पाडयात सुकी मच्छी विकतांना दिसत आहेत़
मात्र गेल्या काही वर्शात मोठया प्रमाणात वाढलेल्या महागाईचा फटका सुक्या मासळीलाही(मावरा)बसला आहे़ दिवसभर पावसात भिजून आलेल्या गडयांला बांगडा भाजून दिला की त्याच्या चेह-यावर समाधान झळकते असते शिवाय कांद्यात तळलेल्या कोलीमबरोबर शेताच्या बांधावर बसून केलेल्या न्याहारीची चव काही वेगळीच असते. एकंदरीत सुकी मासळी (मावरे) ही ग्रामीण भागातील शेतक-यांच्या जेवणातील अतिशय महत्वाचा घटक आहे़ त्यामुळे दर वाढले असले तरी सुकी मासळी खरेदी करणा-या ग्राहकांची गर्दी काही कमी झालेली नाही. यालाच बहुदा मजबूरी का नाम महात्मा गांधी असे म्हटले जात असावे (वार्ताहर)