पुरोगामींची हत्या नथुरामी प्रवृत्तींकडूनच !
By admin | Published: January 17, 2016 04:05 AM2016-01-17T04:05:55+5:302016-01-17T04:05:55+5:30
नथुरामी परंपरेच्या मारेकऱ्यांनीच दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी या विचारवंतांना गोळ्या घातल्या. या प्रवृत्तीचा ठणकावून निषेध करतानाच, बहुजन-अभिजन, डावे-उजवे या दोघांतही कुरूपता
- सुधीर लंके, ज्ञानोबा -तुकारामनगरी ( पिंपरी)
नथुरामी परंपरेच्या मारेकऱ्यांनीच दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी या विचारवंतांना गोळ्या घातल्या. या प्रवृत्तीचा ठणकावून निषेध करतानाच, बहुजन-अभिजन, डावे-उजवे या दोघांतही कुरूपता व सत्याचा अपलाप आहे. दोन्हींकडे जातीवाद असेल, तर सत्य कसे सापडणार? त्यामुळे एकमेकाला अस्पृश्य न ठरविणारा संवादी मार्ग निवडावा लागेल, अशी तिसरी संवादी भूमिका ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी शनिवारी मांडली.
मराठी साहित्य महामंडळ व डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ (पिंपरी-पुणे) यांनी आयोजित केलेल्या मराठी साहित्य संमेलनातील आजवरच्या इतिहासातील सर्वांत ‘वैभवी व श्रीमंत’ अशी गणना होत असलेल्या ८९व्या संमेलनाला येथे दिमाखदार प्रारंभ झाला. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ कवी, गीतकार गुलजार, बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी.वाय. पाटील, मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, संमेलनाचे स्वागताध्यक्ष
डॉ. पी. डी. पाटील, महापौर शकुंतला धराडे, भाग्यश्री पाटील, लता सबनीस यांसह देशातील चार ज्ञानपीठ विजेत्या साहित्यिकांसह विविध मान्यवरांची सोहळ्याच्या व्यासपीठावर भरगच्च उपस्थिती होती.
मोदी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर सबनीस यांच्या अध्यक्षीय भाषणाबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र उद्घाटन समारंभ सुमारे दीड तास उशिरा सुरू होऊन लांबल्याने, तसेच रेंगाळल्याने सबनीस यांनी २५ मिनिटांतच उत्स्फूर्तपणे अध्यक्षीय समारोप केला. अपेक्षेप्रमाणे त्यांनी रोखठोकपणे आपली सांस्कृतिक भूमिका मांडली.
प्रत्येक जण आज आपापल्या पद्धतीने महाराष्ट्राचे मानदंड ठरवत आहे. कुणी ज्ञानेश्वर, तुकाराम, शाहू, फुले, आंबेडकर यांना मानदंड मानतो, तर कुणी गोळवलकर, सावरकर हे मानदंड असल्याचे सांगतो. त्यामुळे नेमके मानदंड कोण आहेत, हा प्रश्न पडतो. महापुरुष व संतांमध्ये आपण भांडणे लावली आहेत. संतांच्या जातनिहाय मांडणीने राज्याचे वाटोळे झाले आहे. साहित्यात प्रस्थापित व विद्रोही असा भेद करून त्यातही आपण महापुरुषांची वाटणी केली आहे. पण, हा भेद संपविण्याची गरज आहे, असे डॉ. सबनीस म्हणाले.
ब्राह्मणी-अब्राह्मणी भेदावरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, प्रस्थापित साहित्याला ब्राह्मणी साहित्य म्हटले जाते. त्यात सर्व ब्राह्मणांना कोंबून आपण मोकळे होतो. मात्र, ग. दि. माडगूळकर व मोरोपंतांची स्मारके शरद पवार यांनी बारामतीत उभारली म्हणून आपण पवारांनाही प्रस्थापित ठरविणार का? सबंध मराठी साहित्य हे प्रस्थापित म्हणत असाल, तर सानेगुरुजींच्या डोळ्यांतील अश्रू ब्राह्मणी की अब्राह्मणी?, कुसुमाग्रजांचा ‘गर्जा जयजयकार’, विश्राम बेडेकरांची ‘रणांगण’ याची विभागणी कशात करायची? तेंडुलकरांची नाटके, मार्क्सवादाला सामोरे जाणारे मर्ढेकर या सर्वांना प्रस्थापितांची शिक्षा द्यायची का? संमेलनात शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व नसल्यामुळे महात्मा फुले यांनी रानडे यांनी भरविलेल्या संमेलनाला विरोध केला होता. पण, आज संमेलनाच्या व्यासपीठावर आम्ही सर्व शेतकऱ्यांची मुले आहोत. त्यामुळे अभिजन-बहुजन, शेतकरी-ब्राह्मण या वेगवेगळ्या परंपरा राहिलेल्या नसून, त्यांचा मिलाप व्यासपीठावर दिसत आहे.
चातुर्वर्र्ण्य ही सहिष्णुता आहे का?
आपला देश व राज्य सहिष्णू आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात मांडली होती. सबनीस म्हणाले, फडणवीस यांच्या भूमिकेशी आपण सहमत आहोत. पण, अहिष्णुतेच्याही काही घटना घडताहेत.
भारतीय परंपरेतील चातुर्वर्ण्य, मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचे आंदोलन, गोध्रा दंगल, इंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी या घटना सहिष्णू आहेत का?
सबनीस विसरले मुख्यमंत्र्यांचा नामोल्लेख
सबनीस यांनी भाषणाच्या सुरुवातीला सर्वांचा नामोल्लेख केला. शरद पवार, रामदास आठवले, पी.डी. पाटील यांच्याबाबत त्यांनी विविध विशेषणे वापरली. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री गिरीश बापट या दोघांचाही नामोल्लेख त्यांनी केला नाही. भाषणाची जवळपास १० मिनिटे झाल्यानंतर सचिन ईटकर यांनी त्यांना चिठ्ठी दिल्यानंतर त्यांच्या ही बाब लक्षात आली. दिलगिरी व्यक्त करीत नामोल्लेख राहून गेल्याचे त्यांनी सांगितले. फडणवीस सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, असे ते या वेळी म्हणाले.
माझ्या भूमिकेला दोष देऊ नका
सबनीस यांनी भाषणाच्या अखेरीस आपल्या भूमिकेबाबत आवाहन केले. ते म्हणाले, चुकत असेल, तर चर्चा करा. पण, भजन-पूजन करणारा हा माणूस काय म्हणतो आहे, काय नवी भूमिका मांडतो आहे, हे समजावून घ्या. सर्व मूल्यांना एकत्र करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. ते पचत नसेल, तर माझ्या भूमिकेला दोष देऊ नका.
आपणाला घेरले जात असताना त्यातून शरद पवारांनी मुक्त केल्याचेही ते म्हणाले. आपले संवादी सूत्र विद्वान व माध्यमे समजून घेणार का, असा सवाल करत माध्यमे ही लोकशाहीच्या तिरडीची दांडी बनल्याची टीका त्यांनी केली.
विचारवंत सत्तेच्या सोयीने बोलणार नाहीत
मी सत्याचा प्रतिनिधी आहे, तर फडणवीस सत्तेचे. दोघांच्याही भूमिकेत वाद असणे शक्य आहे. पण, सत्तेच्या सोयीने विचारवंत किंवा विद्वान सत्य मांडेल, अशी अपेक्षा राजकीय व्यवस्थेतील लोकांनी करू नये, असेही सबनीस म्हणाले.
अध्यक्ष निवडप्रक्रिया बदलण्याची गरज - पवार
मते मिळविणे हे आम्हा राजकारणी लोकांचे काम आहे. साहित्यिकांनी आमचा कित्ता गिरवू नये. संमेलनाध्यक्ष निवडीची पद्धत बदलण्याची गरज आहे. माजी संमेलनाध्यक्षांनी एकत्र येऊन पुढील अध्यक्षांची निवड करावी, असा सल्ला शरद पवार यांनी संमेलनाध्यक्ष निवड प्रक्रियेची पद्धत बदलण्याबाबत दिला. साहित्य संमेलन अध्यक्ष निवड मतदान प्रक्रियेमुळे होत असल्याने अनेक चांगले साहित्यिक संमेलनापासून दूर राहणे पसंत करतात. मते मिळविण्यासाठी आम्हाला काय काय करावे लागते, हे तुम्हाला माहिती नाही. तो आमचा अधिकार आहे. त्याविषयी उघडपणे बोलणार नाही, असे पवार यांनी सांगितले.
आपला देश सहिष्णूच - मुख्यमंत्री
आपला देश पूर्वी सहिष्णू होता आणि आजही आहे. सत्याकडे जाण्यासाठी दोन व अनेक मार्ग असले, तरी संघर्ष व्हायला नको. साहित्यिकांनी समाजाला, आम्हाला विचार व दिशा देण्याचे कार्य करावे. साहित्यातून केवळ प्रश्न निर्माण होऊ नयेत, उत्तरेही मिळाली पाहिजेत, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
आपल्या भाषेतून साहित्य इतर भाषेत गेले पाहिजे. मराठी जागतिक भाषा झाली, तर वैश्विक भाषेचे रूप घेईल, यात शंका नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.