प्रीती राठी अॅसिड हल्ला प्रकरणी आरोपी अंकुर पनवारवर हत्येचा गुन्हा सिद्ध
By Admin | Published: September 6, 2016 12:17 PM2016-09-06T12:17:22+5:302016-09-06T14:41:52+5:30
प्रीती राठी अॅसिड हल्ला प्रकरणी आरोपी अंकुर पनवारला दोषी ठरवण्यात आलं आहे. आरोपी अंकुर पनवारवर हत्येचा गुन्हा निश्चित करण्यात आला आहे
- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - प्रीती राठी अॅसिड हल्ला प्रकरणी आरोपी अंकुर पनवारला दोषी ठरवण्यात आलं आहे. आरोपी अंकुर पनवारवर हत्येचा गुन्हा सिद्ध झाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने हा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. 2013 मध्ये वांद्रे स्थानकावर प्रीती राठीवर अंकुर पनवारने अॅसिड हल्ला केला होता. ज्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. उद्या न्यायालयात शिक्षेवर युक्तिवाद होणार असून त्यानंतर न्यायालय आपला निर्णय देणार आहे.
वांद्रे रेल्वे स्टेशनवर 2 मे 2013 रोजी प्रीती राठीवर अॅसिड हल्ला झाला होता. मात्र महिन्याभराच्या उपचारानंतर प्रीतीची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये तिचा 1 जून रोजी मृत्यू झाला होता.
दिल्लीहून नौदलाच्या हॉस्पिटलमधील नोकरीवर रुजू होण्यासाठी मुंबईत आलेल्या प्रीती हिच्यार २ मे रोजी अज्ञात तरुणाने अॅसिड हल्ला केला होता. या हल्ल्यात प्रीतीच्या एका डोळ्याला दुखापत झाली होती, तर अॅसिडचे काही थेंब तोंडातही गेल्याने अन्ननलिकेला मोठ्या प्रमाणावर इजा पोहोचली होती. तिच्यावर भायखळ्याच्या मसीना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, पुढील उपचारांसाठी आवश्यक असलेल्या कार्डिओ थोरॅसिक सर्जरीची सुविधा या हॉस्पिटलमध्ये नसल्याने तिला १८ मे रोजी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं होतं. त्यानंतर ती व्हेन्टिलेटरवरच होती. अॅसिडमुळे तिच्या शरिरातला एकेक अवयव निकामी होत गेला आणि अखेर तिची मृत्यूशी झुंज संपली.
कुलाबा येथील मेडिकल कॉलेजमधील लेफ्टनंट पदासाठी देशभरातून १५ मुलींची निवड झाली होती; त्यात प्रीतीचाही समावेश होता.