"मुंबईला पाकिस्तान म्हणताना तुला लाज कशी नाही वाटली?" राऊत-कंगनाच्या वादात आता 'या' महिला नेत्याची उडी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 06:47 PM2020-09-03T18:47:30+5:302020-09-03T18:49:50+5:30
कंनाने ट्विट करत आरोप केला होता, की 'मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्यास पुन्हा शहरात येऊ नकोस, असे म्हणत मला राऊत यांनी खुली धमकी दिली. आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यांमुळे मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?'
मुंबई -शिवसेना नेते संजय राऊत आणि अभिनेत्री कंगना रणौत यांच्या वादात आता आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्ता प्रीती शर्मा मेनन यांनी उडी घेतली आहे. कंगनाने संजय राऊतांवर ट्विट करत केलेल्या आरोपावरून प्रीती शर्मा भडकल्या आहेत. त्यांनी कंगनावर निशाणा साधताना, "ज्या मुंबईत स्वतःच करियर बनवलं त्या मुंबईलाच पाकिस्तान म्हणताना तुला लाज कशी नाही वाटली?" असा प्रश्न विचारला आहे.
कंगनाच्या ट्विटला उत्तर देताना मेनन यांनी लिहिले आहे, “राजकीय अजंड्यालाही एक मर्यादा असते. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या हृदयाचा अपमान कसा करू शकता? ज्या मुंबईत स्वतःच करियर बनवलं त्या मुंबईलाच पाकिस्तान म्हणताना तुला लाज कशी नाही वाटली?”
There is a limit to political agendas!
— Preeti Sharma Menon (@PreetiSMenon) September 3, 2020
How can you insult the heart of Chatrapati Shivaji Maharaj's Maharashtra?!
ज्या मुंबईत स्वतःच करियर बनवलं त्या मुंबईलाच पाकिस्तान म्हणताना तुला लाज कशी नाही वाटली? https://t.co/SSapI2I6Da
तत्पूर्वी, कंगनाने मला बॉलीवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची भीती वाटते, असे वक्तव्य केले होते. यावर संजय राऊतांनी, तुम्ही मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवताय. कोणाला इतर राज्याची सुरक्षा हवी असेल तर त्यांनी आपले चंबू गबाळे आवरावे आणि आपल्या राज्यात जावे. हा काय तमाशा चाललाय, असे म्हटले होते. एवढेच नाही, तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी यावर तातडीने उत्तर द्यायला हवे, मग ते कोणीही असोत. या राज्यावर, पोलिसांवर विश्वास नाही. तुम्ही इकडे मीठ खाताय, ही तर बेईमानी आहे आणि अशा व्यक्तींच्या मागे राजकीय पक्ष उभे राहत असतील तर तीसुद्धा मोठी बेईमानीच आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले होते.
यावर, कंनाने ट्विट करत आरोप केला होता, की 'मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्यास पुन्हा शहरात येऊ नकोस, असे म्हणत मला राऊत यांनी खुली धमकी दिली. आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यांमुळे मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?,' असा सवाल कंगनानं ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला होता. यावरूनच मेनन यांनी कंगनावर निशाणा साधला आहे.
Sanjay Raut Shiv Sena leader has given me an open threat and asked me not to come back to Mumbai, after Aazadi graffitis in Mumbai streets and now open threats, why Mumbai is feeling like Pakistan occupied Kashmir? https://t.co/5V1VQLSxh1
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 3, 2020
कंगनाच्या आरोपवजा उत्तराच्या या ट्विटवर राऊतांनी प्रत्युत्तर देत, ट्विटरवर खेळण्यापेक्षा पोलीस आयुक्तांकडे जा आणि तुमच्याकडे असलेले पुरावे त्यांना द्या, असे म्हटले आहे.