‘स्मार्ट सिटी’चे स्वप्न साकारण्यास प्राधान्य
By Admin | Published: April 29, 2016 01:55 AM2016-04-29T01:55:43+5:302016-04-29T01:55:43+5:30
राज्यात पिंपरी-चिंचवड शहराचा चांगला लौकिक आहे. या ठिकाणी विकासाला भरपूर वाव आहे.
पिंपरी : राज्यात पिंपरी-चिंचवड शहराचा चांगला लौकिक आहे. या ठिकाणी विकासाला भरपूर वाव आहे. शहरातील नागरिकांचे ‘स्मार्ट सिटी’चे स्वप्न साकारण्यास माझे प्राधान्य राहणार आहे, असा संकल्प महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
महापालिका आयुक्त राजीव जाधव यांच्या बदलीची अनेक दिवसांपासून चर्चा होती. अखेर बुधवारी रात्री उशिरा त्यावर शिक्कामोर्तब झाले. नवी मुंबईचे आयुक्त दिनेश वाघमारे यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
‘लोकमत’शी बोलताना आयुक्त वाघमारे म्हणाले की, ‘‘औद्योगिकनगरी, बेस्ट सिटी, आयटी हब असलेले शहर अशी पिंपरी-चिंचवडची ओळख आहे. या शहराच्या विकासाबाबत आणि नवनवीन प्रकल्पांबाबत आजपर्यंत ऐकत आलो आहे. मात्र, आता याच शहरात काम करण्याची संधी मिळाली आहे. आयुक्तपदी काम करीत असताना शहराला आणखी प्रगतिपथावर नेण्यासाठी सुरुवातीपासूनच योग्य नियोजन करण्याचा प्रयत्न राहील.
शहराचे नागरीकरण दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्या दृष्टीने सुविधा पुरविणेही आवश्यक आहे. पायाभूत सुविधा पुरविण्यास प्राधान्य दिले जाईल. प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणण्यासाठी आवश्यक ते बदल केले जातील. यासह शहराला भेडसावणारे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. शहराला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी योग्य नियोजन केले जाईल. शहराला चाळीस वर्षांचा इतिहास आहे. इथे काम करण्याची संधी मला मिळाली आहे. नवी मुंबईसारख्या महानगरात काम केल्याच्या अनुभवाचा शहराचे नियोजन व विकास करताना उपयोग होईल, अशी माझी धारणा आहे.
(प्रतिनिधी)