वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाला प्राधान्य
By admin | Published: February 13, 2015 01:21 AM2015-02-13T01:21:49+5:302015-02-13T01:21:49+5:30
विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाचे काम सर्वोच्च प्राधान्याने पूर्ण करण्यात येईल,
मुंबई : विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाचे काम सर्वोच्च प्राधान्याने पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमतचे चेअरमन खा.विजय दर्डा यांच्याशी झालेल्या चर्चेत दिले. या रेल्वेमार्गासह विदर्भ विकासाच्या विविध मुद्यांवर खा.दर्डा यांनी आज मुख्यमंत्र्यांशी वर्षा निवासस्थानी दीर्घ चर्चा केली. लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यावेळी उपस्थित होते.
रेल्वेमार्गासाठी खा.दर्डा यांनी केलेल्या पाठपुराव्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील जे पाच रेल्वेमार्ग प्राधान्याने पूर्ण करण्याचे आपण ठरविले आहे, त्यात या रेल्वेमार्गाचा समावेश असेल. राज्यातील रखडलेल्या रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी आपण नुकतीच चर्चा केली. या रेल्वेमार्गाचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे याकडे खा.दर्डा यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. २००८ मध्ये मंजुरी मिळाल्यानंतर अद्याप चार टक्केही काम पूर्ण झालेले नाही. हीच गती कायम राहिली तर १०८ वर्षेही तो पूर्ण होणार नाही. केंद्र सरकारने विशेष बाब म्हणून ६० टक्के निधी या प्रकल्पासाठी दिला आहे. आहे, अशी माहिती खा.दर्डा यांनी दिली.