मराठवाड्यात नगदी पिकांना प्राधान्य; खरिपाचा पॅटर्न बदलतोय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 08:02 AM2021-06-02T08:02:27+5:302021-06-02T08:02:36+5:30

पाण्याची उपलब्धता, तंत्रज्ञान आणि बाजारपेठेतील मागणीमुळे कापसापेक्षा सोयाबीन, मका, तुरीला जास्त पसंती शेतकऱ्यांतून मिळत आहे.

Preference for cash crops in Marathwada | मराठवाड्यात नगदी पिकांना प्राधान्य; खरिपाचा पॅटर्न बदलतोय

मराठवाड्यात नगदी पिकांना प्राधान्य; खरिपाचा पॅटर्न बदलतोय

Next

- योगेश पायघन

औरंगाबाद : मराठवाड्यात खरिपातील पीक पेरणीचा पॅटर्न दिवसेंदिवस नगदी पिकांकडे वळतो आहे. पाण्याची उपलब्धता, तंत्रज्ञान आणि बाजारपेठेतील मागणीमुळे कापसापेक्षा सोयाबीन, मका, तुरीला जास्त पसंती शेतकऱ्यांतून मिळत आहे. कमी दिवसांचे पीक घेऊन उन्हाळी पीक लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल असून, आता खरिपासाठी शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे लागले आहेत.

सोयाबीनला सर्वाधिक पसंती, मका, हळद लागवडीकडे अधिक कल 
औरंगाबाद जिल्ह्यात कपाशीची लागवड काहीशी कमी होऊन मका, सोयाबीन आणि तुरीच्या क्षेत्रवाढीचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. जालना जिल्ह्यात सोयाबीन आणि मक्याचे क्षेत्र वाढणार असल्याने परिणामी तूर, कपाशीचे क्षेत्र घटणार आहे.
बीडमध्ये सोयाबीन, तूर, लातूरमध्ये तूर, उस्मानाबादेत ऊस, तर परभणी, हिंगोलीत सोयाबीन आणि नांदेड जिल्ह्यात हळदीची लागवड गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक होण्याची शक्यता आहे. 
सरासरी क्षेत्राच्या अंदाजानुसार ८० ते १०० टक्के लागवड प्रत्यक्ष होते. काही लागवड ही शंभर टक्क्यांपेक्षा अधिक होते. त्यात प्रामुख्याने सोयाबीनचा समावेश आहे. सोयाबीनच्या बियाणांची यावर्षी तुटवड्याची शक्यता आहे.  

औरंगाबादेत कापसाचे क्षेत्र अधिक असले तरी मका, सोयाबीन, तुरीचे क्षेत्र वाढत आहे. तर, जालन्यात सोयाबीन लागवडीला पसंती देताना दिसत आहे. बीडमध्ये उसाचे क्षेत्र वाढताना सोयाबीनचेही क्षेत्र वाढेल.            
    - डॉ. दिनकर जाधव, विभागीय कृषी 
    सहसंचालक, औरंगाबाद

लातूर, उस्मानाबादमध्ये कापूस कमी होऊन सोयाबीनचे लागवड क्षेत्र वाढत आहे. उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोलीत जिथे पाणी मुबलक आहे अशा परिसरात उसाचे क्षेत्र वाढत असून साखर कारखान्यांच्या क्षेत्रात पाण्याच्या उपलब्धतेनुसार उसाच्या पारंपरिक क्षेत्रावर परिणाम जाणवतोय. नांदेडमध्ये हळदीची लागवड वाढताना दिसतेय. कापसावरची बोंडअळी, वाढलेला खर्च यामुळे तुलनेत सोयाबीनला शेतकरी पसंती देत आहेत. 

२०२१ मधील अंदाजित पीक क्षेत्र  (आकडेवारी हेक्टरमध्ये)
जिल्हा    कापूस    सोयाबीन    मका    तूर    बाजरी
औरंगाबाद    ३,९०,८००       १३,३००    १,७९,५९०    ३५,१०१    २९,९३५
जालना       २,८८,४५०    १,४५,३००    ४८,९४०    ६,०३०    १४,०००
बीड    २,७२,०००    २,९०,०००    १०,०००    ८१,०००    ६०,०००
लातूर    ८,०००    ४,५०,०००    ४,५००    ९०,०००    ६००
उस्मानाबाद    ७,५००    ३,७४,६००    १३,५००    ६९,५५५    २,६००
नांदेड    २,१५,८००    ४,०१,०००    ७००    ७८,०००    ५०
परभणी    १,९७,०००    २,४२,०००    ०००    ४६,२५०    ६००
हिंगोली    ३२,२९८    ३,६३,३७७    १५०१    ४०,०३९    ०००

Web Title: Preference for cash crops in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.