भोंदूच्या उपचारांमुळे गर्भवतीचा मृत्यू
By admin | Published: June 9, 2016 05:53 AM2016-06-09T05:53:27+5:302016-06-09T05:53:27+5:30
राज्यात जादुटोणाविरोधी विधेयक पारित होऊनही, अंधश्रद्धेमुळे जाणारे बळी पूर्णपणे रोखण्यात शासन आणि समाजाला अद्यापही यश आलेले नाही
गडचिरोली : राज्यात जादुटोणाविरोधी विधेयक पारित होऊनही, अंधश्रद्धेमुळे जाणारे बळी पूर्णपणे रोखण्यात शासन आणि समाजाला अद्यापही यश आलेले नाही. एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या बुर्गी येथील मीना संतोष हिचामी या २० वर्षीय गर्भवती महिलेचाही सोमवारी अंधश्रद्धेने बळी घेतला आहे. काविळीच्या आजारावर ती गेले १५ दिवस तुमरगुंडा येथील भोंदू पुजाऱ्याकडे उपचार घेत होती.
१८ मे रोजी पोटात दुखत असल्याने मीनाने बुर्गी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारही घेतले होते. त्यानंतर तिला एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात आणि उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे हलविण्यात आले. तेथे १८ ते २४ मे या कालावधीत उपचार करून तिला सुटी देण्यात आली होती, अशी माहिती मीना पती संतोष याने दिली. मीनाला कावीळ, सिकलसेलचा आजार असल्याने अहेरी उपजिल्हा रुग्णालयातून सुटी मिळाल्यावर २४ मे पासून तिला येमली येथील पुजाऱ्याकडे ठेवण्यात आले होते. ५ जूनला रात्री मीनाची तब्येत झपाट्याने खालावली व तिला तुमरगुंडा गावात माहेरी आणण्यात आले. तुमरगुंडा येथे आणून त्या रात्री तुमरगुंडा गावातील पुजाऱ्याकडे तिच्यावर पुन्हा उपचार सुरू झाले. (प्रतिनिधी)
>अंगणवाडी सेविकेचे दुर्लक्ष
बुर्गी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत गर्भवती मातांना पोषण आहार पुरविण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकेकडे आहे व आरोग्य तपासणीचीही जबाबदारी अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांच्याकडे आहे. परंतु तब्बल १५ दिवस पुजाऱ्याकडे या महिलेवर उपचार सुरू असताना आरोग्य यंत्रणेच्या या कर्मचाऱ्यांना ही माहिती कशी मिळाली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मीना हिचामी या महिलेचा मृत्यू आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे झालेला नाही. या महिलेने पुजाऱ्याकडे उपचार केल्यामुळे तिचा मृत्यू झाला. तिला काविळ व सिकलसेल आजार होता. असे मृत्यू टाळण्यासाठी कोणत्याही रुग्णांनी पुजाऱ्यांकडे उपचार घेऊ नये.
- डॉ. पवन राऊत, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी, एटापल्ली.