गर्भवतीला मारहाण; पोलिसांना दंड
By Admin | Published: May 15, 2014 02:27 AM2014-05-15T02:27:06+5:302014-05-15T02:27:06+5:30
महिलांवरील गुन्ह्यांचा आलेख वाढत असताना त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी असणार्या खाकी वर्दीवाल्यांकडून निरपराध महिलांवर होणारा अत्याचार मानवी हक्क आयोगाने चव्हाट्यावर आणून फटकारले आहे.
जमीर काझी, मुंबई - राज्यात एकीकडे महिलांवरील गुन्ह्यांचा आलेख वाढत असताना त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी असणार्या खाकी वर्दीवाल्यांकडून निरपराध महिलांवर होणार्या अत्याचारांच्या घटनेला राज्य मानवी हक्क आयोगाने चव्हाट्यावर आणून फटकारले आहे. बुलडाणा पोलिसांनी एका घरझडतीमध्ये गर्भवती महिलेला मारहाण करून गर्भपातास कारणीभूत ठरल्याबद्दल १ लाखांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश गृह विभागाला दिले आहेत. त्याचप्रमाणे पोलीस अधिकार्यांनी निष्पाप व निरपराध नागरिकांशी योग्य व्यवहार करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. बुलडाण्यातील देऊळघाट येथील शयस्ताबी प्रवीण शेख यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आयोगाचे सदस्य भगवंतराव मोरे यांनी हा निकाल दिला. वैद्यकीय तपासणीमध्ये महिलेच्या पोटावर मारहाणीच्या खुणा नसल्या तरी त्या धक्क्यामुळे गर्भपात झाल्याने त्यांनी पोलिसांना दोषी ठरवत भरपाईची पूर्तता करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे. शयस्ताबी यांचा पती रहिमान शेख काही जणांसमवेत परिसरात वरळी मटका घेत असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक मनोज केदार यांच्या नेतृत्वाखाली दोन महिला कॉन्स्टेबलसह ६ जणांच्या पथकाने १६ डिसेंबर २०१२ ला दुपारी त्यांच्या घरावर छापा टाकला. मात्र, रहिमान न मिळाल्याने पोलिसांनी घरातील खुर्ची व साहित्याची मोडतोड करून शयस्ताबीला मारहाण करून घरातील ३५ हजार रुपये घेऊन गेले़ त्या वेळी तिने व शेजार्यांनी ती गर्भवती असल्याने मारहाण करू नये, अशी विनंती करूनही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार शयस्ताबी हिने आयोगाकडे केलेल्या अर्जात केली होती. त्याबाबत, पाठवलेल्या नोटीसनुसार बुलडाण्याच्या तत्कालीन उपविभागीय अधिकारी कल्पना बारवकर यांनी याप्रकरणी चौकशी करून तक्रारीत तथ्य नसल्याचा अहवाल आयोगाकडे पाठवला होता. मात्र, सदस्य भगवंतराव मोरे यांनी आयोगाच्या विशेष पथकाकडून याप्रकरणी पुन्हा स्वतंत्रपणे चौकशी केली. त्यामध्ये शयस्ताबी शेख या मारहाणीबद्दल तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्या असता पोटात दुखू लागल्याने त्याबाबत डायरीत काहीही नोंद न करता त्यांना स्थानिक सरकारी रुग्णालयात पाठवले. मात्र, त्रास कमी न झाल्याने दुसर्या दिवशी त्यांना तेथून औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हलवले. या ठिकाणच्या तपासणीमध्ये शेख यांच्या डाव्या बाजूला व मांडीवर मारहाण झाल्याचे व पोटावर मारहाणीच्या खुणा आढळल्या नाहीत. मात्र, पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. रुग्णालयातील केसपेपरवर पेंशटच्या तपासणीचे कारण पोलिसांची मारहाण असे नमूद असल्याचे आढळून आले. तक्रारदार महिला, शेजारी, पोलीस अधिकारी व डॉक्टरांच्या साक्षीमध्ये शेख यांच्या घरामध्ये छापा टाकल्याचे व त्यांना मारहाण झाल्याचे स्पष्ट झाले. पोटावर थेटपणे मारहाण झाली नसली तरी मानसिक धक्क्यामुळे गर्भपात झाल्याचा निष्कर्ष काढला. पोलिसांनी मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याने अशा प्रवृत्तीला प्रतिबंध घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची सूचना आयोगाने गृह विभागाला केली.