गर्भवतीला पोलिसाकडून धक्काबुक्की?
By Admin | Published: August 10, 2016 04:34 AM2016-08-10T04:34:50+5:302016-08-10T04:34:50+5:30
पोलीस कर्मचाऱ्याने एका गर्भवतीला धक्काबुक्की केल्याचा कथित प्रकार अंधेरी पश्चिम येथील तहसीलदार कार्यालयासमोर सोमवारी सायंकाळी घडला.
मुंबई : पोलीस कर्मचाऱ्याने एका गर्भवतीला धक्काबुक्की केल्याचा कथित प्रकार अंधेरी पश्चिम येथील तहसीलदार कार्यालयासमोर सोमवारी सायंकाळी घडला. संबंधित महिलेने पोलिसाविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. संगीता पवार असे या महिलेचे नाव आहे.
संगीता या तहसीलदार कार्यालयात त्यांच्या मामेभावाचे डोमिसाईल प्रमाणपत्र आणण्यासाठी गेल्या होत्या. संध्याकाळी ६च्या सुमारास त्या कार्यालयाच्या बाकावर बसून फॉर्म भरत असताना नायब तहसीलदार चवरे आणि त्यांचे अंगरक्षक पोलीस शिपाई गोरखनाथ जाधव त्या ठिकाणी आले. यांनी पवार यांना कार्यालय बंद असून, तुम्ही इथून निघून जा असे सांगितले. मात्र बाहेर पाऊस आहे आणि मी पतीची वाट पाहत आहे, असे सांगितले. तरीदेखील त्यांनी हुज्जत घातली. पवार यांचे पती विश्वजीत तिथे पोहोचले आणि असभ्य वर्तनाचा जाब त्यांनी चवरे आणि जाधव यांना विचारला. तेव्हा जाधवने त्यांच्या श्रीमुखात भडकावली, असे विश्वजीत यांनी सांगितले. त्यानंतर या जोडप्याला डी. एन. नगर पोलीस ठाण्यात नेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच रात्री १२ वाजेपर्यंत बसवून नंतर सोडण्यात आले, असे दाम्पत्याचे म्हणणे आहे.
महिला ही नायब तहसीलदाराशी बाचाबाची करत असल्याने तिने त्यांच्याशी नीट बोलावे, असे सांगितले. तेव्हा तिने आणि तिच्या पतीने त्या पोलीस शिपायालाच धक्काबुक्की केली, असे डी. एन. नगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनाजी नलावडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)