पुणे जिल्ह्यातील गरोदर मातांना मिळणार 'बाळंत विडा' किट; राज्यातील पहिलाच प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 11:37 AM2021-01-30T11:37:18+5:302021-01-30T11:37:53+5:30
राज्यातील हा पहिलाच प्रयोग असून, महिलांचा व बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
सुषमा नेहरकर-शिंदे
पुणे : जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील महिलांना गरोदरपणात व डिलिव्हरी झाल्यानंतर पोषण आहार न मिळाल्याने कुपोषित बालकांचा जन्म होतो. हे टाळण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन जिल्ह्यातील सर्व डिलिव्हरीच्या उंबरठ्यावर असलेल्या व डिलिव्हरी झालेल्या स्तनन मातांना काळी खारीक, सेंद्रिय गुळ, काजु, शुध्द गाईचे तुप असा विविध पौष्टिक साहित्यांचा 'बाळंत विडा' किट देण्यात येणार आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असून, महिलांचा व बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी राज्य शासन व जिल्हा परिषदेच्या वतीने विविध योजना राबविण्यात येतात. यात गरोदर मातांची नियमित तपासणी पासून विविध आवश्यक गोळ्या औषधे देणे, कडधान्य पुरवणे आदी उपक्रम राबविण्यात येतात. ऐवढी काळजी घेऊन देखील जिल्ह्यातील काही तालुक्यातील कुपोषण कमी होताना दिसत नाही. यामुळेच पुणे जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन गरोदर माता व डिलिव्हरी झालेल्या मातांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी ' बाळंत विडा' ही योजना घेतली आहे. यासाठी तब्बल 1 कोटी 25 लाखांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. यात सर्वसाधारण गटातील महिलांसाठी 75 लाख रुपये व मागासवर्गीय गटातील महिलांसाठी 50 लाख राखीव ठेवण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागा मार्फत ही योजना राबविण्यात येत असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी दिली.
------
कुपोषण कमी करणे हाच मुख्ये उद्देश
जिल्ह्यातील बालकांमध्ये आजही कुपोषणाचे प्रमाण मोठे आहे. यात केवळ दुर्गम, आदिवासी भागातील बालकेच नव्हे तर सधन तालुक्यात देखील हे प्रमाण जास्त आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने गरोदर महिलांना ' बाळंत विडा ' हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
- पुजा पारगे, सभापती महिला व बालकल्याण विभाग
-------
बाळंत विडा किटमध्ये काय-काय असणार
- काळी खारीक
- सेंद्रिय गुळ
- खोबरे
- गाईचे शुध्द तुप
- काजु
- शेंगदाणे
- भाजकी डाळ
- डिंक