गर्भवतीने सूर्यग्रहणात जाळल्या अंधश्रद्धा, भाजी चिरून ग्रहणही पाहिले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 09:04 PM2020-06-21T21:04:29+5:302020-06-21T21:15:34+5:30
अंनिसचा धाडसी उपक्रम रविवारी पार पडला. समृद्धी चंदन जाधव असे या आधुनिक युगातील सावित्रीचे नाव आहे.
इस्लामपूर : अंधश्रद्धांची जळमटे बाजूला करून विज्ञानाच्या प्रकाशमयी वाटेवर चालण्याचा संदेश देत इस्लामपूर येथील गर्भवती महिलेने रविवारी भर सूर्यग्रहणात भाजी चिरली. तसेच अन्नाचे सेवन करतानाच तिने सौरचष्म्यातून सूर्याशी डोळेही भिडविले.
अंनिसचा धाडसी उपक्रम रविवारी पार पडला. समृद्धी चंदन जाधव असे या आधुनिक युगातील सावित्रीचे नाव आहे. सूर्यग्रहणाच्या काळात या अंधश्रद्धारूपी भुताला गाडून टाकण्याचे काम महाराष्ट्र अंनिसच्या इस्लामपूर शाखेने करून दाखविले आहे. समृद्धी जाधव यांनी पिढ्यान् पिढ्या असणा-या ग्रहणकाळातील विविध अंधश्रद्धा झुगारून दाखविल्या. ग्रहणाच्या काळात भाजी चिरणे, फळे कापणे, झाडांची फळे-पाने तोडणे, अन्न खाणे, पाणी पिणे, हाताची घडी घालणे, मांडी घालून बसणे यांसह विविध शारीरिक हालचाली करीत ग्रहण कालावधी आनंदात व्यतीत केला. यावेळी त्यांच्यावर उपचार करणा-या डॉ. सीमा पोरवाल उपस्थित होत्या.
आंतरजातीय विवाह करत जातीपातीची बंधने तोडणा-या आणि आज अंधश्रद्धेची जळमटे झुगारणा-या समृद्धी जाधव म्हणाल्या, आधुनिक काळात अशा अंधश्रद्धा बाळगणे मान्य नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संजय बनसोडे, डॉ. नितीन शिंदे, प्रा. अर्जुन पन्हाळे, प्रा. तृप्ती थोरात यांनी माझे व माझ्या कुटुंबाचे प्रबोधन केले. त्यामुळेच आम्ही हे पाऊल टाकले आहे. माझ्या कुटुंबियांनी मला साथ दिली. सासुबाई श्रीमती सिंधुताई जाधव, चंदन जाधव, दीपक जाधव यांनी प्रोत्साहन दिले. या उपक्रमात सहभागी होऊन मला आनंद वाटला.
इस्लामपूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. सीमा पोरवाल म्हणाल्या, ग्रहणाच्या कालावधित गर्भवती महिलेवर व गर्भावर कोणताही परिणाम होत नाही. बाळाची वाढ पहिल्या तीन महिन्यांत पूर्ण झालेली असते. या काळात ग्रहण पाहिल्याने व कोणतीही शारीरिक कृती केल्याने बाळाला इजा होते, ही निव्वळ अंधश्रद्धा आहे, हे या उपक्रमातून सिद्ध होईल. हा उपक्रम समाजाला वैज्ञानिक दृष्टी देणारा ठरेल.
प्रा. शामराव पाटील म्हणाले, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धेविरुद्ध मोठी चळवळ उभी केली. अंनिस नेहमीच कृतिशील पाऊल टाकत असते, हेच या उपक्रमातून स्पष्ट झाले आहे. हा उपक्रम ग्रहणाबाबत जनमानसात मोठे प्रबोधन करणारा ठरेल. अंनिसचे प्रधान सचिव संजय बनसोडे म्हणाले, खगोलीय घटना अनुभवल्या पाहिजेत. आजचा कार्यक्रम आगळ्यावेगळ्या पद्धतीने पार पाडणा-या समृद्धीचे कौतुक आहे. त्यांची कृती प्रेरणादायी आहे.