प्रीलिस्टमधील दुरुस्त्या आॅफलाइन स्वीकारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2016 01:16 AM2016-12-27T01:16:33+5:302016-12-27T01:16:33+5:30
शिक्षण विभाग आता तांत्रिकदृष्ट्या प्रगत होत आहे. शिक्षण विभागातील काही प्रक्रिया या आता पूर्णत: आॅनलाईन सुरू केल्या आहेत. पण, आॅनलाइन प्रक्रियेत काही बिघाड
मुंबई : शिक्षण विभाग आता तांत्रिकदृष्ट्या प्रगत होत आहे. शिक्षण विभागातील काही प्रक्रिया या आता पूर्णत: आॅनलाईन सुरू केल्या आहेत. पण, आॅनलाइन प्रक्रियेत काही बिघाड येत असल्यामुळे आता पुन्हा आॅफलाइन प्रक्रिया कराव्या लागत आहेत. दहावीच्या परीक्षेची प्रीलिस्ट मधील सुधारणा आता आॅफलाइन कराव्यात असे परिपत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून शाळांना पाठविण्यात आले आहे.
जून २०१६ मध्ये अकरावीचे झालेले प्रवेश हे आॅनलाइन पद्धतीने करण्यात आले होते. त्यामध्येही विद्यार्थ्यांना अनेक अडचणी आल्या होत्या. त्यानंतर मार्च २०१७ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षांची प्रक्रिया ही मंडळाने आॅनलाइन केली आहे. दहावी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या याद्या आॅनलाइन करण्यात आल्या होत्या. पण, आता त्यात दुरुस्ती असल्यास शाळांना आॅफलाइन दुरुस्ती करावी लागणार आहे. मुंबई विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या माध्यमिक शाळांतील आवेदनपत्रे आॅनलाईन भरण्यात आली होती. या आवेदनपत्रात बदल करण्याची शेवटची तारीख ही १९ डिसेंबर ही होती. पण, या दुरुस्तीवेळी सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाले. त्यामुळे शिक्षकांना पुन्हा आॅफलाइनही काम करावे लागले. (प्रतिनिधी)