बॉम्बस्फोट घडविण्याची इसिसची तयारी !

By admin | Published: January 23, 2016 03:55 AM2016-01-23T03:55:31+5:302016-01-23T03:55:31+5:30

राज्यात प्रजासत्ताक दिनी बॉम्बस्फोट घडविण्याचा कट महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दोन तरुणांना अटक करून उधळून लावला आहे

Preparation of bomb blast! | बॉम्बस्फोट घडविण्याची इसिसची तयारी !

बॉम्बस्फोट घडविण्याची इसिसची तयारी !

Next

डिप्पी वांकाणी ,  मुंबई
राज्यात प्रजासत्ताक दिनी बॉम्बस्फोट घडविण्याचा कट महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दोन तरुणांना अटक करून उधळून लावला आहे. सिरियातील युद्धात भाग घेण्यासाठी इसिसचे समर्थक आतापर्यंत तिकडे जायचे; परंतु आता त्यांनी भारताविरुद्ध हल्ल्याचा पवित्रा घेतल्याने तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.
मुदब्बीर शेख याच्या अटकेनंतर खान मोहम्मद हुसेन या व्यावसायिकालाही दोन तपास यंत्रणांनी संयुक्त कारवाईत शुक्रवारी रात्री ९ वाजता अटक केली. बॉम्ब तयार करून प्रजासत्ताक दिनी घातपात घडविण्याचा घडविण्याच्या प्रयत्नांत तो होता, असे एटीएसमधील सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले. तर खान मोहम्मद हुसेन हा मुदब्बीरशी संपर्कात होता आणि आणखी काही लोक या कामासाठी भरती करण्याची जबाबदारी हुसेनवर होती.
इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅण्ड सिरियासाठी (इसिस) मुदब्बीर शेख हा भारतात मोठा भरती (रिक्रुटर) करणारा होता. मुदब्बीर हा ‘अन्सार उल तौहीद’शी संबंधित होता. अन्सार उल तौहीदची स्थापना तालिबानसाठी इंडियन मुजाहिदीनमधून फुटून बाहेर पडलेल्या गटाने केली होती. भारतविरोधात कारवाया करण्यासाठी सध्या तो इसिसशी जोडला गेलेला आहे.
शुक्रवार सकाळीच एटीएसचे १२ आणि एनआयएचे चार अधिकारी आणि १६ पोलीस कर्मचाऱ्यांनी शेखच्या घरावर छापा टाकला आणि त्याला अटक केली. त्यावेळी तेथून दोन लाख रुपये रोख आणि तीन इलेक्ट्रॉनिक साधने जप्त केली. शेख हा या गटाचा स्वयंघोषित ‘आमिर’ असून त्यांनी या गटाला ‘जानूद-उल- खलिफा-ए-हिंद’ असे नावही दिले आहे. मुदब्बीर शेख हा यंत्रणांच्या हाती लागण्यात उशीर झाला असता तर त्याने त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने बॉम्बस्फोट घडविला असता. त्याचा वापर करणारी विदेशी व्यक्ती कोण हेही आम्ही ओळखले असून ती व्यक्ती स्वत:ला ‘युसुफ’ म्हणविते, अशी माहिती तपास यंत्रणेतील एका अधिकाऱ्याने दिली.

Web Title: Preparation of bomb blast!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.