तयारी ‘आयएएस’ची
By Admin | Published: February 12, 2017 12:41 AM2017-02-12T00:41:37+5:302017-02-12T00:41:37+5:30
परीक्षेसाठी उमेदवाराचे वय २१ वर्षे आवश्यक आहे. खुल्या प्रवर्र्गांसाठी कमाल वयोमर्यादा ३२ वर्षे असून ६ संधी उपलब्ध आहेत. इतर मागास उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे असून ९
- प्रा. राजेंद्र चिंचोले
परीक्षेसाठी उमेदवाराचे वय २१ वर्षे आवश्यक आहे. खुल्या प्रवर्र्गांसाठी कमाल वयोमर्यादा ३२ वर्षे असून ६ संधी उपलब्ध आहेत. इतर मागास उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे असून ९ संधी उपलब्ध आहेत, तर अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा ३७ वर्षे असून संधीची मर्यादा नाही. यासाठी उमेदवाराने मान्याताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केली पाहिजे.
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये अत्यंत मानाची, अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा परीक्षा म्हणजे नागरी सेवा परीक्षा (Civil Services Examination) होय. नागरी सेवा परीक्षा ही भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वांत कठीण परीक्षेपैकी एक समजली जाते. नागरी सेवा परीक्षेमार्फत IAS, IPS, IFS यासारख्या अखिल भारतीय सेवा तसेच भारतीय महसूल सेवा IRS, भारतीय पोस्टल सेवा, भारतीय रेल्वे सेवा, भारतीय आॅॅडिट सेवा, भारतीय अकाउंट सेवा यासारख्या केंद्रातल्या महत्त्वाच्या विभागातल्या उच्च श्रेणी वर्ग-१ अधिकाऱ्यांची निवड केली जाते.
या परीक्षेत यशस्वी होणाऱ्या मराठी उमेदवारांची संख्या सातत्याने वाढत आहे. २०११ पासून संघ लोकसेवा आयोगाने परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल केले आहेत. नागरी सेवा परीक्षा ही संघ लोकसेवा आयोगाद्वारे ३ टप्प्यांत घेतली जाते.
१) नागरी सेवा पूर्व परीक्षा
२) मुख्य लेखी परीक्षा
३) नागरी सेवा व्यक्तिमत्त्व चाचणी.
उमेदवाराच्या निवडीसाठी नागरी सेवा पूर्व परीक्षेचे गुण विचारात घेतले जात नाहीत. नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या लेखी परीक्षेत मिळालेले गुण व व्यक्तिमत्त्व चाचणी म्हणजेच मुलाखतीत मिळालेले गुण यांची एकत्रित बेरीज करून अंतिम गुणवत्ता यादीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाते.
पूर्व परीक्षेला देशातून सुमारे १० लाख उमेदवार परीक्षा देतात. त्यापैकी साधारणत: १२ ते १५ हजार उमेदवार पूर्व परीक्षा उत्तीर्ण होतात. पूर्व परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतात. यातून साधारणत: दोन हजार ते अडीच हजार उमेदवार मुख्य लेखी परीक्षा उत्तीर्ण होतात. एकूण पदसंख्येच्या दुप्पट उमेदवारांना व्यक्तिमत्त्व चाचणी म्हणजेच मुलाखतीस बोलाविले जाते. यातून सुमारे हजार उमेदवारांची अंतिम निवड के ली जाते. या वर्षाची केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा १८ जून २०१७ रोजी होणार आहे.
प्रवेश अर्ज (Union Public Service Comission) च्या वेबसाइटवर आॅनलाइन भरायचे आहेत. नागरी सेवा परीक्षेच्या तयारीत विद्यार्थ्याने पूर्व, मुख्य व व्यक्तिमत्त्व चाचणी हे ३ टप्पे वेगळे असले तरी त्याचा अभ्यास समग्र दृष्टिकोनातूनच केला पाहिजे. योग्य संदर्भ ग्रंथांचा वापर, नियमित दर्जेदार वृत्तपत्र वाचन, योग्य दिशेने अभ्यास केल्यास प्रशासकीय सेवा क्षेत्रातील अत्युच्च संधी उपलब्ध होऊ शकते.
rjchinchole@gmail.com