सर्व सोडून मुक्ताई चरणी येण्याची तयारी!
By admin | Published: June 1, 2016 04:39 AM2016-06-01T04:39:54+5:302016-06-01T04:39:54+5:30
‘चमत्काराशिवाय नमस्कार नाही, जोपर्यंत मुक्ताई माझ्या पाठिशी आहे, तोपर्यंत चिंता करण्याची गरज नाही. कॅबिनेटची बैठक काय, मंत्रिमंडळ काय आणि मंत्री काय, सर्व सोडून मुक्ताई चरणी येण्याची तयारी आहे
मुक्ताईनगर (जि. जळगाव) : ‘चमत्काराशिवाय नमस्कार नाही, जोपर्यंत मुक्ताई माझ्या पाठिशी आहे, तोपर्यंत चिंता करण्याची गरज नाही. कॅबिनेटची बैठक काय, मंत्रिमंडळ काय आणि मंत्री काय, सर्व सोडून मुक्ताई चरणी येण्याची तयारी आहे,’ असे सांगत ‘घालोनिया भार राहिलो निश्चिंती...!’ असे अनेक अर्थांनी सूचक वक्तव्य महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे केले.
श्रीक्षेत्र कोथळी (मुक्ताईनगर जि. जळगाव) येथे मंगळवारी संत मुक्ताई अंतर्धान सोहळा व मुक्ताई मंदिर नूतनीकरण व जीर्णोद्धार सोहळ्याच्या कार्यक्रमात ते म्हणाले की, ‘लहानपणापासून पांडुरंगाच्या दिशेने जाणारा हा वारकरी आहे. केले ते जनतेसाठी केले आहे.’
‘माझा भार वाहण्यासाठी हे वारकरी बसले आहे. घालोनिया भार राहिलो निश्चिंती...! निरविली संती विठोबाची।’ या तुकाराम महाराजांच्या अभगांच्या ओळी सांगत त्यांनी आपणास कुठलीही चिंता नाही, भीती नाही. अनेक कावळे काव-काव करीत असल्याची टिप्पणी त्यांनी केली.
सकाळी १०.३० वा. खडसे मुक्ताईनगरात दाखल झाले. ‘उत्तर महाराष्ट्र विद्यापीठास संत मुक्ताईचे नाव देण्याच्या मागणीबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांसमोर प्रस्ताव मांडून विद्यापीठ नामकरणाची मागणी करू,’ असेही खडसे म्हणाले़ (वार्ताहर)लाल दिव्याविना आले
खडसे हे लालदिवा नसलेल्या अन्य सरकारी वाहनाने मुक्ताईनगरात दाखल झाले. लाल दिव्याच्या वाहनात पाठदुखीचा त्रास होत असल्याने त्यांनी दुसरे वाहन घेतल्याचे सांगण्यात आले. या वाहनाला क्रमांकही नव्हता. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यानंतर जिल्ह्यात अनेक अफवाही पसरल्या. लालदिव्याचे अन्य वाहन मुक्ताईनगरला पाठविण्यासाठी जिल्हा प्रशासनाची धावपळ झाली.