‘सर्व ४८ मतदारसंघात लोकसभेची तयारी’
By admin | Published: April 26, 2017 02:32 AM2017-04-26T02:32:24+5:302017-04-26T02:32:24+5:30
२०१९ मधील लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात भाजपाला स्वबळावर लढायची आहे या दृष्टीनेच आगामी काळात लक्ष केंद्रित केले जाईल, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी आज सांगितले.
मुंबई : २०१९ मधील लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात भाजपाला स्वबळावर लढायची आहे या दृष्टीनेच आगामी काळात लक्ष केंद्रित केले जाईल, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी आज सांगितले.
२०१९ मधील लोकसभेची निवडणूक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढण्याचा निर्णय एनडीएच्या दिल्लीतील बैठकीत घेण्यात आला होता. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे २०१९ ची निवडणूक भाजपा-शिवसेना एकत्रित लढणार असल्याचे चित्र निर्माण केले जात असतानाच त्याला फाटा देत दानवे यांनी लोकसभेसाठीही ‘शत प्रतिशत भाजपा’ची भूमिका लोकमतशी बोलताना मांडली. ते म्हणाले की भाजपा-शिवसेना युतीचा निर्णय उद्या कदाचित होईलही पण तो होणारच आहे असे समजून सध्या शिवसेनेकडे असलेल्या मतदारसंघांमध्ये भाजपाचा विस्तारच करू नये हे शक्य नाही. तशी चर्चादेखील पक्षामध्ये झालेली नाही.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे किमान २५ आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावा खा. दानवे यांनी केला. दुसरे पक्ष फोडण्यात आम्हाला रस नाही पण ते होऊन येणार असतील तर आम्ही दारे का बंद करायची, असा सवाल त्यांनी केला. (प्रतिनिधी)