आगामी निवडणुकीसाठी मनसेची तयारी? थेट मेलद्वारे संपर्क करण्याचे राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 11:48 PM2017-08-27T23:48:46+5:302017-08-27T23:49:15+5:30
आपसातील गट - तट खपवून घेणार नाही. कोणत्याही पदाधिका-याची अथवा कोणाचीही तक्रार किंवा कोणतीही समस्या असल्यास आपल्याला थेट वैयक्तिक मेल आयडीवर संपर्क करुन सूचना करु शकता
ठाणे: आपसातील गट - तट खपवून घेणार नाही. कोणत्याही पदाधिका-याची अथवा कोणाचीही तक्रार किंवा कोणतीही समस्या असल्यास आपल्याला थेट वैयक्तिक मेल आयडीवर संपर्क करुन सूचना करु शकता, असे आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले. ठाण्यासह राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये मनसेला पराभवाची झळ बसल्यानंतर संघटनेत काही बदल करण्याच्या दृष्टीने त्यांनी ठाण्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले.
ठाणे महापालिका निवडणूकीत मनसेला भोपळाही फोडता आला नाही. अगदी नाशिकमध्येही पराभवाला सामोरे जावे लागले. मुंबई आणि कल्याण डोंबिवलीत तर अगदी मोजक्या जागांवर मनसेला विजय मिळविता आला. या सर्वच पराभवांच्या पार्श्वभूमीवर संघटनेत शहर, जिल्हा आणि राज्य पातळीवर बदल करण्याचे संकेत राज ठाकरे यांनी दिले आहेत. मुंबईतही काही महत्वपूर्ण बदल केल्यानंतर त्यांनी ठाण्यातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. विशेष म्हणजे यावेळी प्रथमच त्यांनी शहर आणि जिल्हा पातळीवरील पदाधिकाºयांच्या तक्रारी तळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून जाणून घेतल्या. रविवारी सकाळी ८ ते ९ वाजण्याच्या सुमारास त्यांनी प्रथम ठाणे शहर संपर्क अध्यक्ष अभिजित पानसे, शहराध्यक्ष अविनाश जाधव, प्रदेश सचिव प्रमोद पाटील, पक्ष प्रवक्ता संदीप देशपांडे, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदीप पाचंगे आदी २० ते २५ पदाधिकाºयांशी चर्चा केली. त्यानंतर पाचपाखाडी येथील एका खासगी सभागृहात त्यांनी सर्व प्रमुख पदाधिका-यांना बाहेर थांबण्याचे फर्मान दिले. कोणत्याही कार्यकर्त्यांची पदाधिका-याविरुद्ध तक्रार असेल तर तो मोकळेपणाने बोलू शकेल, यासाठी त्यांनी पदाधिकाºयांना बाहेर थांबण्याचे हे आदेश दिले. साधारण दोन ते अडीच तास चाललेल्या या मेळाव्यात राज यांनी थेट शाखा अध्यक्ष, उप शाखाअध्यक्ष, गट अध्यक्ष अशा अगदी शेवटच्या पातळीवरील कार्यकर्त्यांशी संवाद साधून संघटनेत काय बदल अपेक्षित आहेत, याबाबतच्या सूचना जाणून घेतल्या. यावेळी काही विधानसभा अध्यक्ष तसेच पदाधिकाºयांविरुद्धही कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आपण आता पक्षात राज्यभर बदल करणार आहे. प्रत्येकाशी संवाद साधणे शक्य होत नाही. त्यामुळे तुम्ही आयोजिलेले कार्यक्रम किंवा कोणत्या पदाधिका-याविरुद्धची वास्तववादी तक्रार असल्यास थेट आपल्याकडे ( connectrajthackeray@gmail.com) या मेल आयडी वर संपर्क करु शकता, असे आवाहन त्यांनी केले. ठाकरे यांच्या या आवाहनामुळे कार्यकर्त्यांमध्येही एक प्रकारे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. आपण आता थेट राज ठाकरे साहेबांच्या संपर्कात राहणार, या कल्पनेनेच अनेकांनी या संकल्पनेचे समाधान व्यक्त करीत स्वागतही केले. अर्थात, यातून नेमेके कोणते बदल होतील आणि कोणत्या पदाधिकाºयाची गच्छंती होईल किंवा कोणाच्या पथ्यावर पडेल, हे आगामी काळातच स्पष्ट होणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी मात्र कोणतेही भाष्य न करता राज यांनी मुंबईकडे प्रयाण केले.