कोल्हापुरात नवरात्रोत्सवाच्या तयारीची लगबग
By Admin | Published: September 24, 2014 01:45 AM2014-09-24T01:45:54+5:302014-09-24T01:45:54+5:30
देवस्थान समितीच्या जवळ असणार्या कार्यालयात सकाळी साडेदहाला दागिन्यांच्या स्वच्छतेला प्रारंभ झाला
कोल्हापूर: शहरात शारदीय नवरात्रोत्सवाच्या तयारीची लगबग सुरू आहे. करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मानदंड, मोरपक्षी, चंद्रहार, पुतळाहार, ठुशी, बोरमाळ, म्हाळुंग, पुतळ्याची माळ, सोन्याची गदा अशा अनेक प्राचीन नित्यालंकार व उत्सवालंकारांची स्वच्छता करण्यात आली. देवस्थान समितीच्या जवळ असणार्या कार्यालयात सकाळी साडेदहाला दागिन्यांच्या स्वच्छतेला प्रारंभ झाला. प्रारंभी देवीच्या अलंकारांचे नित्यालंकार म्हणजे रोज घातल्या जाणार्या अलंकारांची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर उत्सवालंकार म्हणजे खास सणावेळी घातल्या जाणार्या अलंकारांची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये माणिक हार, चौरीमोरचेल, कर्णफुले, जडावाचा किरीट, सर, नथ, चिंचपेटी, मोत्याचा हार, श्रीयंत्र हार, चंद्रकोरहार, चाफेकळी, साज, मोहनमाळ, सोन्याचे गजरे, पाचपदरी कंठी, सोळापदरी माळ, पाचपदरी माळ, देवीच्या उत्सवमूर्तीचे दागिने अशा सर्व प्रकारच्या सुवर्ण अलंकारांची आज स्वच्छता करण्यात आली. दागिन्यांच्या रखवालीचा मान असलेले महेश खांडेकर हे यावेळी उपस्थित होते.
मंदिर परिसरात घालण्यात आलेली फरशी पाण्याचा फवारा मारून स्वच्छ करण्यास सुरुवात करण्यात आली. स्वच्छतेमुळे एकप्रकारे मंदिर परिसराला झळाळी आली आहे.
अतिक्रमण हटविले
महाद्वार दरवाजासमोरील देवीचे साहित्य विक्री करणार्या विक्रेत्यांनी दुकानाबाहेर आलेले साहित्य स्वत:हून आतमध्ये घेतले, तर नियमित रस्त्यावर आवळा, चिंच व विविध साहित्याची विक्री करणार्या छोट्या व्यापार्यांनीही आपले साहित्य येथून हलविले. त्यामुळे हा परिसर स्वच्छ व चालण्यास मोकळा करण्यात आला.
पोलीस नियंत्रण मंडप पोलीस ठाण्याच्या आवारात
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विद्यापीठ हायस्कूल दरवाजासमोर दरवर्षीप्रमाणे उभारण्यात येणारा मंडप यंदा जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या दारात उभा करण्यात आला आहे. यापूर्वीच्या ठिकाणी मंडप उभारणी केल्यामुळे भाविकांना अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे हा विचार करून पोलीस प्रशासनाने चांगला निर्णय घेतल्याबद्दल भाविकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
मंदिर सुरक्षेची विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून पाहणी
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांनी अंबाबाई मंदिर आणि भवानी मंडप परिसरातील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख मनोजकुमार शर्मा उपस्थित होते.
वॉच टॉवर, सीसीटीव्ही कॅमेरे
नवरात्रोत्सवानिमित्त देशभरातून लाखो भाविक अंबाबाई दर्शनासाठी येत असल्याने गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी वॉच टॉवर, सीसीटीव्ही कॅमेरेही उभे केले असून, भाविकांच्या जीवितास कोणताही धोका पोहोचू नये व गर्दीवर ताबा ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे मोठय़ा प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे.