राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात!
By Admin | Published: December 25, 2015 03:10 AM2015-12-25T03:10:11+5:302015-12-25T03:10:11+5:30
शेतक-यांचे विविध प्रयोग राहतील प्रदर्शनाचे आकर्षण.
अकोला : डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ११७ व्या जयंतीनिमित्त येत्या २७ ते २९ डिसेंबरपर्यंत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन अँग्रोटेक-२0१५ चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात असून, शेतकर्यांनी त्यांच्या शेतावर केलेले प्रयोग या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण राहील. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत होत असलेल्या या कृषी प्रदर्शनाचे आयोजन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, आत्मा व जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. या प्रदर्शनात ३00 च्यावर गाळे उभारण्यात आले असून, यात विविध कृषी तंत्रज्ञान, नवे संशोधन माहिती शेतकर्यांसाठी ठेवण्यात येत आहे. अलीकडच्या काही वर्षात पावसाची अनियमितता वाढली आहे. या पृष्ठभूमीवर पाण्याची बचत आणि संबंधित तंत्रज्ञानावर भर देण्याची गरज असल्याने प्रदर्शनात याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या कृषी प्रदर्शनांतर्गत कृषी विद्यापीठे, शासकीय संस्था, तसेच कृषी क्षेत्रात आधुनिक उत्पादने निर्मिती करणार्या खासगी कंपन्या, प्रगत उत्पादने आणि यंत्राचे सादरीकरण, पाणी, खते आणि कीटकनाशक ांचा कमीतकमी वापर करू न भरपूर उत्पादने मिळवण्यासाठीचे तंत्रज्ञान या ठिकाणी शेतकर्यांसाठी मांडले जाणार आहे. या प्रदर्शनात कृषी विद्यापीठ व संलग्न कृषी संस्थांची दालने तसेच कृषी विभाग, कृषी अवजारे व उत्पादने, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय विकास, ग्रामीण व्यवसाय, कृषी व ग्रामीण उद्योग आदी दालनांसह कृषी व कृषी संलग्नित योजनांची माहिती, फळ व भाजीपाला प्रदर्शन यासह बचत गटांचा सहभाग व विद्यापीठांच्या प्रकाशनाची रेलचेल येथे असेल. शेतकरी फूलशेतीकडे वळल्याने फूलशेती व वनौषधीबाबतची माहिती येथे उपलब्ध असेल. कापूस, ज्वारी, गहू, कडधान्य, तेलबिया, पाणलोट विकास ऊस, कृषी अभियांत्रिकी विभागाची उत्पादने येथे ठेवली जाणार आहेत.