कृत्रिम पावसाची तयारी!

By admin | Published: May 23, 2015 01:59 AM2015-05-23T01:59:22+5:302015-05-23T01:59:22+5:30

पावसाने पाठ फिरवल्याने होणारे नुकसान टाळण्यासाठी या वर्षी सरकारने राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याची प्रशासकीय तयारी पूर्ण केली आहे.

Preparations for artificial rain! | कृत्रिम पावसाची तयारी!

कृत्रिम पावसाची तयारी!

Next

हवामानात आमूलाग्र बदल : राज्यातील तापमान वाढले, उष्माघाताचे ४३ बळी
अतुल कुलकर्णी - मुंबई
पावसाचे बिघडलेले वेळापत्रक, बियाणे रुजण्याच्या अथवा ज्या वेळी पिकांना पावसाची गरज असते, त्याच काळात पावसाने पाठ फिरवल्याने होणारे नुकसान टाळण्यासाठी या वर्षी सरकारने राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याची प्रशासकीय तयारी पूर्ण केली आहे. यासाठी भारतीय हवामान विभाग, इंडियन इन्स्टिट्युट आॅफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी विभाग, राज्य सरकारच्या मदत व व पुनर्वसन विभागाचे अधिकारी यांची समितीही स्थापन करण्यात आली असून, याचे प्रात्यक्षिक लवकरच केले जाणार आहे.
दुष्काळग्रस्त मराठवाडा आणि विदर्भातील अमरावतीची मध्यवर्ती केंद्र म्हणून निवड करण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणी विमान उडण्याची व उतरण्याची सोय आहे. शिवाय हे दोन्ही विभाग दुष्काळाने होरपळलेले आहेत, म्हणून ही निवड करण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. महसूल विभागाने याकामी पुढाकार घेतला असून यासाठीच्या चार ते पाच बैठका आजपर्यंत झाल्या आहेत. याआधी राज्यात सप्टेंबर १९९३ मध्ये आणि त्यानंतर २००३ साली एकदा कृत्रीम पावसाचा प्रयोग केला गेला; मात्र हे प्रयोग पाऊस पूर्णत: लांबल्यानंतर केले गेले होते, असे मदत व पुर्नवसन विभागाचे अधिकारी सुहास दिवसे यांनी स्पष्ट केले. यावर्षी १५ जून पर्यंत कृत्रीम पावसासाठीची सगळी तयारी पूर्ण करुन ठेवली जाईल आणि पाऊस लांबतो आहे असे लक्षात आले की असा पाऊस पाडला जाईल, असे दिवसे म्हणाले.


महाराष्ट्र हातोय गरम!
पुढील दोन दिवस म्हणजेच २४ मे पर्यंत राज्यात उष्णतेची लाट कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. शुक्रवारी राज्यात सर्वाधिक ४७.६ अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूरमध्ये नोंदविले गेले. राज्यातील बहुतांशी शहरांचे कमाल तापमान सरासरीपेक्षा २ ते ५ अंशांनी वाढलेले होते. विदर्भ आणि मराठवाड्यातील शहरांचे तापमान ४२ ते ४७ अंशादरम्यान होते. मध्य महाराष्ट्रातील शहरांचे तापमान ३६ ते ४४ अंशाच्या घरात होते. कोकणाचे तापमान सरासरीच्या जवळ होते. मात्र वाढीव आर्द्रतेमुळे या भागातही उकाडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. बहुसंख्य ठिकाणी किमान तापमानही सरासरीच्या वरच होते. त्यामुळे रात्रीही उकाडा जाणवत होता.
शुक्रवारचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)- वर्धा- ४६.९ नागपूर ४६.५ , ब्रम्हपुरी ४५.८, पुणे ३६.७, जळगाव ४४.२, कोल्हापूर ३५.३, महाबळेश्वर २९.८, मालेगाव ४३.५, नाशिक ३८.१, सांगली ३७.५, सातारा ३९, सोलापूर ४२.९, मुंबई ३४.८, अलिबाग ३३.९, रत्नागिरी ३४.३, डहाणू ३५.७, भिरा ३९, उस्मानाबाद ४२.७, औरंगाबाद ४२.१, परभणी ४४.७, नांदेड ४३.५, अकोला ४४.७, अमरावती ४४.८, बुलडाणा ४१, ब्रम्हपुरी ४५.८, चंद्रपूर ४७.६, नागपूर ४६.५, वाशिम ४२.६, वर्धा ४६.९, यवतमाळ ४४.८.

पावसाळ्याऐवजी थंडीत
सरासरीपेक्षा जास्त पाऊस
गतवर्षी मान्सूनने खूप निराशा केली. त्यामुळे पाऊस सरसरीसुद्धा गाठू शकला नाही. असे असताना हिवाळ्यात मात्र पावसाने जोरदार हजेरी लावली. तो सरासरीपेक्षा जास्त म्हणजे तब्बल ११३ टक्क पडला.

महाराष्ट्रात सर्वाधिक फटका
हिवाळ्यात पडलेल्या पावसाचा फटका सर्वाधिक महाराष्ट्राला बसला आहे. या काळात महाराष्ट्रात सरासरीच्या १८५ टक्के पाऊस झाला. महाराष्ट्राबरोबर मध्य भारतात हिवाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून १९५१नंतर पहिल्यांदाच हिवाळ््यामध्ये पावसाची एवढ्या मोठ्या प्रमाणात नोंद झाल्याचे हवामानशास्त्र विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

राज्याचे तापमानही
सरासरीच्या वर !
हिवाळा म्हटले की, सर्वत्र आल्हाद वातावरण असते. पण २०१४मध्ये महाराष्ट्रात हिवाळा जाणवलाच नाही. महाराष्ट्राचे तापमान बहुतांश वेळा सरासरीपेक्षा १ ते २ अंशांनी वाढलेलेच असायचे, असे अहवालात म्हटले आहे.

विदर्भात पारा चढाच
नागपूर : सलग चौथ्या दिवशीही विदर्भात उष्णतेची लाट कायम असल्याने जनजीवन होरपळून निघाले आहे. शुक्रवारी विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर येथे (४७.६) झाली. त्या खालोखाल वर्धा (४६.९) आणि नागपूर (४६.५) येथे जास्त तापमान होते.
वाशीम, बुलडाणा वगळता विदर्भातील सर्व जिल्ह्यांचे तापमान ४४ अंशापेक्षा जास्त होते. उन्हाची तीव्रता पश्चिम विदर्भाच्या तुलनेत पूर्व विदर्भात अधिक आहे. उष्णतेची लाट आणखी काही दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

सोशल मीडियावरही ‘वादळ’!
पुणे : अरबी समुद्रात ‘अशोब्बा’ नावाचे चक्रीवादळ आले असून ते गुजरातच्या समुद्रकिनाऱ्याला धडकणार आहे आणि महाराष्ट्राच्या किनाऱ्यालाही त्याचा फटका बसू शकतो, अशी अफवा सध्या सोशल मिडियाच्या विविध साईट्सवर मोठ्या प्रमाणात फिरत आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. पण अरबी समुद्रात असे कोणतेही चक्रीवादळ आलेले नसल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले आहे.


दिल्लीत या मोसमातील सर्वाधिक ४३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून सामान्य सरासरीापेक्षा ते चार अंशाने जास्त आहे. संध्याकाळी वातावरण थोडे ढगाळ बनल्यामुळे दिल्लीवासीयांना उष्णतेपासून किंचित दिलासा मिळाला. शनिवारी मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवल्याने दिल्लीत उष्णतेचा प्रभाव जाणवणार नाही, असा अंदाज आहे.
पंजाब आणि हरियाणातही अनेक शहरांमध्ये सामन्यापेक्षा जास्त तापमान नोंदले गेले. हिस्सारमध्ये सर्वाधिक ४५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हरियाणाच्या भिवानी, अंबाला, नारनौल आणि कर्नाल येथेही पारा चांगलाच वाढला आहे.



गेल्या वर्षात तापमानात १-२ अंशांची वाढ
पुणे : महाराष्ट्राचे तापमान वाढत चालले असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने केलेल्या अभ्यासात दिसून आले आहे. गेल्या वर्षभरात राज्याच्या तापमान सरासरीपेक्षा १ ते २ अंशांनी वाढ झाली असून, याचा विपरीत परिणाम शेती, पाणी यावर होण्याचा धोका आहे.

च्भारतीय हवामानशास्त्र विभागाने २०१४चा वार्षिक अहवाल नुकताच सादर केला. या अहवालात महाराष्ट्राचे तापमान वाढत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

च्तापमानवाढीचा सर्वाधिक वेग मध्य महाराष्ट्रात असून, कोकणलाही हवामानतील बदलांचा सामना करावा लागत असल्याचे त्यातील आकडेवारीवरून दिसून येत आहे.
च्एकीकडे कोकणातील बहुतांश भागात दिवसाच्या उष्म्यात वाढ होत आहे, तर दुसरीकडे रात्रीच्या तापमानात घट होतेय.

च्याशिवाय कोकणात पावसाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील पावसाचे प्रमाण कमी होत असल्याची नोंद या अहवालात आहे.

मागील प्रयोगासाठी ४ कोटींच्या आसपास खर्च आला होता. यावेळी किमान ८ ते १० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मात्र नुकसान होण्यापेक्षा या खर्चात पिकं वाचवण्यासाठी हा प्रयोग करण्यात येत असल्याचेही खडसे म्हणाले.

आपल्याकडे आयएमडीचे नागपूर, पुणे आणि मुंबई अशा तीन ठिकाणी डॉपलर रडार आहेत. शिवाय ज्या कंपनीला काम दिले आहे, ते त्यांचे एक डॉपलर रडार आणणार आहेत. या चार रडारांच्या माध्यमातून पावसाच्या ढगांची माहिती मिळण्यास मदत होईल.

ढगात मिठाची फवारणी
जगभरात रॉकेट आणि विमानाद्वारे कृत्रिम पाऊस पाडला जातो. रॉकेटच्या साहाय्याने पाऊस पाडल्यास २० किमी परिसरात तर विमानाद्वारे २०० ते ३०० किमीच्या भागात पाऊस पडतो. सिल्व्हर आयोडाइडची फवारणी केल्यामुळे पाण्याचे थेंब गतिमान होतात.

विशाखापट्टणम/हैदराबाद : आंध्र प्रदेश आणि तेलंगण या दोन्ही राज्यांत सूर्य आग ओकू लागला असून, उष्माघाताचे एकूूण ४३ बळी गेले आहेत. आंध्रात २२ तर लगतच्या तेलंगणमध्ये २१ जणांचा बळी गेला आहे. तीन दिवसांत आंध्रातील विविध भागांत कमाल तापमान ४२ ते ४५ अंश सेल्सिअस होते.
आंध्रासोबतच तेलंगणही उष्णतेने होरपळून निघाला आहे. राज्यात उष्माघाताने आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला. महसूल सचिव बी. आर. मीना यांनी येत्या रविवारपर्यंत राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे, असे हवामान खात्याच्या हवाल्याने सांगितले. नालगोडा, निझामाबाद, करीमनगर या जिल्ह्यांत सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.

Web Title: Preparations for artificial rain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.