लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू; निवडणूक विभाग लागला कामाला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 08:08 AM2023-07-13T08:08:34+5:302023-07-13T08:09:02+5:30
दोन लाख नवीन ईव्हीएम मशिन दाखल
मनोज मोघे
मुंबई : राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार तयारी असताना दुसरीकडे निवडणूक आयोगानेही जय्यत तयारी सुरू केली आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांत सुमारे १ लाख मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी दोन लाख नवीन ईव्हीएम मशिन दाखल झाल्या आहेत. प्रत्येक जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांकडे या ईव्हीएम सोपविण्यात आल्या असून, आता प्राथमिक स्तरावर राज्य निवडणूक आयोगाने त्याची चाचणीही सुरू केली आहे.
सध्या राज्यासह देशभरातील राजकीय वर्तुळात लोकसभा निवडणुकांवर लक्ष ठेवून हालचाली सुरू आहेत. १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ २६ मे २०२४ रोजी संपत आहे. त्यापूर्वी निवडणुका होऊन नवी लोकसभा अस्तित्वात येईल. या निवडणुकीसाठी तयारी सुरू झाल्याचे राज्य निवडणूक आयाेगाचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.
राज्यात सुमारे एक लाख मतदान केंद्र आहेत. त्याच्या दुप्पट बॅलेट युनिट (ईव्हीएम)ची आवश्यकता असते. सध्या राज्याकडे पूर्णत: सुस्थितीत असलेली ६१ हजार बॅलेट युनिट आहेत. नवीन १ लाख ९२ हजार बॅलेट युनिट घेण्यात आली आहेत. अशी एकूण २ लाख ५३ हजार बॅलेट युनिट राज्याकडे आहेत. जुनी २६ हजार सेंट्रल युनिट आहेत. नवीन १ लाख २२ हजार सेंट्रल युनिट घेण्यात आली आहेत. एकूण एक लाख ४८ हजार सेंट्रल युनिट सज्ज ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे २२ हजार जुनी सुस्थितीतील व्हीव्हीपॅट यंत्रे आहेत. १.३५ लाख नवीन व्हीव्हीपॅट मशिन घेण्यात आल्या. १.५७ लाख एकूण युनिट निवडणुकीसाठी तयार ठेवण्यात आली आहेत.
अशी होते तपासणी
‘भेल’चे अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, निवडणूक अधिकारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्यासमोर या सर्व ईव्हीएमची चाचणी करण्यात येत आहे. त्यांच्यासमोरच या सर्व प्रक्रियेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करून ते मशिन सील केले जाते. सध्या २६ जिल्ह्यांतील मशिनची पहिली चाचणी पूर्ण झाली आहे. पुढच्या दोन तपासण्या मतदान जवळ आल्यानंतर करण्यात येतात.
विधानसभा निवडणूक एकत्र झाल्यास दुप्पट मशिन लागणार
विधानसभेचा कार्यकाळ २५ ऑक्टोबर २०२४ रोजी संपत आहे. केंद्र सरकारने लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका घ्यायची तयारी करण्यास सांगितल्यास लोकसभेसाठी लागणाऱ्या यंत्रणेच्या दुप्पट यंत्रणा राबवावी लागणार आहे. असे झाल्यास अन्य राज्यांतून यंत्रे मागवावी लागतील. केंद्रातून तसे ठरल्यास पुढील दोन महिन्यांत त्याची तयारी करता येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.