तोडसाम प्रकरण विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांच्या दरबारात नेण्याची कंत्राटदार संघटनेची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 04:07 AM2017-09-09T04:07:30+5:302017-09-09T04:07:50+5:30
आर्णी-केळापूरचे भाजपा आमदार राजू तोडसाम यांनी कंत्राटदाराला केलेल्या मोबाइल कॉलची आॅडिओ क्लिप व्हायरल झाली. आमदाराने पैसे मागितल्याचा आरोप कंत्राटदाराने केला आहे.
यवतमाळ : जिल्ह्यातील आर्णी-केळापूरचे भाजपा आमदार राजू तोडसाम यांनी कंत्राटदाराला केलेल्या मोबाइल कॉलची आॅडिओ क्लिप व्हायरल झाली. आमदाराने पैसे मागितल्याचा आरोप कंत्राटदाराने केला आहे. आता हे प्रकरण विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांच्या दरबारात नेण्याची तयारी कंत्राटदार संघटनेने चालविली आहे. त्या अनुषंगाने शनिवारी जिल्हा कंत्राटदार संघटनेची बैठक बोलविण्यात आली आहे.
आर्णी मतदारसंघातील बांधकामांबाबत आमदार तोडसाम यांनी कंत्राटदार शिवदत्त शर्मा यांना मोबाइलवर संपर्क केला. या संभाषणाची आॅडिओ क्लिप गुरुवारी सोशल मीडियावर व्हायरल झाली. आमदारांनी पैसे मागितले, ते न दिल्यास गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत केलेल्या कामांची चौकशी करण्याची धमकी दिली, पुन्हा मतदारसंघात कामे करू नका, असे बजावले आदी आरोप कंत्राटदाराने केले आहेत.
गुरुवारी सायंकाळी शर्मा यांनी यासंदार्भात पोलीस ठाण्यात अर्जही दिला होता.
जिल्हा कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष अरविंद वाढोणकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, नागपूर येथे कंत्राटदारांचे विदर्भस्तरीय आंदोलन झाले. त्यात आ. तोडसाम यांचा निषेध करण्यात आला. हे प्रकरण विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे मांडले जाणार आहे. शनिवारी जिल्हा कंत्राटदार संघटनेची बैठक होत आहे.
पोलीस म्हणतात, तक्रारच नाही-
वडगाव रोडचे ठाणेदार बाळासाहेब खाडे म्हणाले, कंत्राटदार शर्मा यांनी गुरुवारी रितसर तक्रार नव्हे तर केवळ पोलिसांच्या माहितीसाठी अर्ज दिला होता. त्यांचा जाब-जबाब नोंदविला गेला. तेव्हा त्यांनी हा केवळ माहितीस्तव अर्ज असल्याचे सांगितल्याने त्यावर चौकशी किंवा गुन्हा दाखल केला गेला नाही.
आमदार खोटे बोलत आहेत-
कंत्राटदार शर्मा म्हणाले, आ. तोडसाम यांची सखोल चौकशी झाली पाहिजे. प्रकरण अंगाशी आल्याचे पाहून आमदार खोटे बोलत आहे. त्यांनी बांधकाम निकृष्ट असल्याचा आरोप केला आहे. ते निकृष्ट असते तर देयके कशी मंजूर झाली असती, असा सवाल शर्मा यांनी केला.
कुणाची तरी चाल असावी-
भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे म्हणाले, आ. तोडसाम यांनी कंत्राटदार शर्मा यांना फोन केला, हे वास्तव आहे. मात्र संपूर्ण कॉल रेकॉर्ड केला गेल्याने ही कुणाची तरी चाल असावी, अशी शंका येते. आपण तोडसाम यांच्याशी संपर्क केला.
राज्यमंत्री-आमदारांचा संपर्कच नाही-
जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार आणि आमदार राजू तोडसाम यांच्याशी ़ संपर्क झाला नाही.