हाउसिंग सोसायट्या, शाळांमध्ये होमगार्डस्; प्रस्ताव तयार करा, गृहराज्यमंत्री भोयर यांच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 14:05 IST2025-01-09T14:05:18+5:302025-01-09T14:05:44+5:30
या निर्णयाचा दुहेरी फायदा होईल. एकतर हाउसिंग सोसायट्या, शाळा आणि अन्य ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेची एक विश्वासार्हता असेल.

हाउसिंग सोसायट्या, शाळांमध्ये होमगार्डस्; प्रस्ताव तयार करा, गृहराज्यमंत्री भोयर यांच्या सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यातील हाउसिंग सोसायट्या, शाळा व अन्य काही सरकारी कार्यालयांमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून गृहरक्षकांची (होमगार्ड) नियुक्ती करण्याची बाब विचाराधीन आहे. यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर यांनी अधिकाऱ्यांना बुधवारी दिले.
भोयर यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, हाउसिंग सोसायट्या, शाळांच्या सुरक्षेचा विषय गंभीर बनला आहे. काही ठिकाणी सुरक्षा रक्षकच चुकीच्या कामांमध्ये सामील असल्याचे समोर आले आहे. अशावेळी सुरक्षेची यंत्रणा विश्वासार्ह असावी, यासाठी होमगार्डनाच सुरक्षा रक्षक म्हणून नेमण्याचा विचार समोर आला आहे.
राज्यात ४८ हजार होमगार्डस् आहेत. ते गृहविभागाच्या नियमित सेवेमध्ये नसतात. त्यांची सेवा महिन्यातून जितके दिवस घेतली जाते तितक्या दिवसांचे मानधन त्यांना दिले जाते. सध्या हे मानधन दरदिवशी १,२८३ रुपये इतके आहे. त्यांना महिन्यातील काहीच दिवस काम मिळते. सण-उत्सवांच्या काळात (गणेशोत्सव, नवरात्र आदी) त्यांना तुलनेने अधिक दिवस काम मिळते.
राज्यमंत्री भोयर यांनी सांगितले की, सुरक्षा रक्षक म्हणून होमगार्डसना नेमण्याचा निर्णय झाला तर त्यांना मासिक मानधन किती असावे, याचे स्वरूप निश्चित केले जाईल. या निर्णयाचा दुहेरी फायदा होईल. एकतर हाउसिंग सोसायट्या, शाळा आणि अन्य ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेची एक विश्वासार्हता असेल.
तीन वर्षांनी नूतनीकरण
- पोलिस दलाला अंतर्गत सुरक्षा राखण्यासाठी साहाय्य करणे हे होमगार्डचे कर्तव्य असते. होमगार्डसना सनद क्रमांक दिला जातो आणि दर तीन वर्षांनी त्याचे नूतनीकरण केले जाते.
- जितक्या दिवसांसाठी त्यांना काम देण्यात आले होते, त्याच्या किमान ५० दिवस त्यांनी ड्यूटी केलेली असेल तरच पुढील तीन वर्षांसाठी नूतनीकरण केले जाते.