सीबीआय चौकशीला तयार
By admin | Published: May 16, 2016 02:00 AM2016-05-16T02:00:56+5:302016-05-16T02:00:56+5:30
गजनान पाटील नावाच्या व्यक्तीने ३० कोटींची लाच मागितल्याप्रकरणी आपण स्वत: चौकशीची मागणी केली आहे.
जळगाव : महसूल विभागाच्या जमिनीच्या बदल्यात गजनान पाटील नावाच्या व्यक्तीने ३० कोटींची लाच मागितल्याप्रकरणी आपण स्वत: चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे सीबीआयच काय, इतर कोणत्याही मोठ्या यंत्रणेद्वारे चौकशी झाल्यास त्याचीही तयारी आहे. या प्रकरणाचा संपूर्णपणे छडा लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी रविवारी सांगितले.
तक्रारदार डॉ. रमेश जाधव यांनी २००८-०९मध्ये जमिनीच्या मागणीसाठी शासनाकडे अर्ज केला होता. मात्र तो अर्ज फेटाळला होता. दरम्यान त्यांनी आपल्याकडे पुनर्विचार याचिका दाखल केली. त्यात मागील मंत्री, अधिकारी यांनी संगनमत करीत जमीन नाकारल्याचा आरोप केला. महसूलमंत्री म्हणून आपल्याला अर्ध न्यायीकचा दर्जा आहे. ही जमीन गायरानाची आहे. जमीन परिवहन खात्याकडे वर्ग केली आहे. तसेच परिवहन विभागाने या जमिनीची ५ कोटी रुपयांची रक्कम शासनाकडे भरणा केली असल्याने ही जमीन देता येत नसल्याचा निर्णय आपण २५ फेब्रुवारी रोजी दिला. हा निर्णय ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारदार यांना कळविला. त्यानंतर एप्रिल महिन्यात तक्रारदार यांनी लाचेची मागणी केल्याचा आरोप केला, असे खडसे म्हणाले. तक्रारदाराने सुरुवातीला १५ कोटींच्या लाचेची मागणीचा आरोप केला. नंतर ३० कोटी मागितल्याचा आरोप केला. रेडीरेकनरच्या दरानुसार ज्या जमिनीची किंमत ५ कोटी आहे. त्यासाठी ३० कोटींची मागणी होईल कशी, असा सवालही खडसे यांनी उपस्थित केला. तक्रारदाराने केलेले आरोप व पूर्व इतिहास पाहता ती व्यक्ती विकृत असल्याचे लक्षात येते, असेही खडसे म्हणाले.
>हे गजाननला माहीत नाही
गजानन पाटील हा आपल्या मतदारसंघातील व्यक्ती आहे. वारकरी असल्यामुळे आपल्यासोबत तो आषाढीच्या वारीमध्ये अनेकदा आला आहे. त्याची ओळख नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. कोटीमध्ये किती शून्य असतात, हे त्याला सांगता येणार नाही, असेही खडसे म्हणाले.