नवी मुंबईतल्या आंबेडकर स्मारकाच्या सजावटीचा प्रस्ताव तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 03:07 AM2017-09-18T03:07:04+5:302017-09-18T03:07:10+5:30
ऐरोलीमधील रखडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्मारकामधील अंतर्गत सजावटीचा प्रस्ताव १९ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे. त्यासाठी ११ कोटी ९९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
नवी मुंबई : ऐरोलीमधील रखडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्मारकामधील अंतर्गत सजावटीचा प्रस्ताव १९ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे. त्यासाठी ११ कोटी ९९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्याचा प्रस्ताव १० फेब्रुवारी २००९मध्ये सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर झाला होता. प्रशासकीय मंजुरीला आठ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही अद्याप स्मारकाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. स्मारकाच्या डोमला मोर्बल लावायचे की नाही, यावरून एक वर्ष नगरसेवक व यापूर्वीचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यामध्ये वाद सुरू होते. अखेर डोमला मार्बल लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्मारकाचे काम दोन वर्षांमध्ये पूर्ण होणे आवश्यक होते; पण प्रत्यक्षात विविध कारणांनी ते रखडत गेले.
अनेक वेळा स्मारकाच्या उद्घाटनाच्या तारखांची घोषणाही करण्यात आली; पण प्रत्यक्षात स्मारकाचा मुख्य भाग असलेल्या अंतर्गत सजावटीचा प्रस्तावच तयार करण्यात आलेला नव्हता. स्मारकासाठी पाठपुरावा करणाºयांचेही याकडे दुर्लक्ष झाले होते. महापौर सुधाकर सोनावणे व इतर दक्ष लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यानंतर अंतर्गंत सजावटीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मंगळवारी होणाºया सर्वसाधारण सभेमध्ये हा प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहे.
अंतर्गत सजावटीमध्ये फ्लोरिंगमध्ये किरकोळ बदल करणे, फॉल सिलिंग करणे, रंगकाम करणे, रेलिंग करणे, स्ट्रक्चरल स्टीलचे काम करणे, मॉड्युलर फर्निचर, खिडक्यांना पडदे, वातानुकूलित यंत्रणा बसविणे, स्मारकास भेट देणाºया नागरिकांसाठी दृक-श्राव्य माध्यमाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार दाखविण्यासाठी व्यवस्था तयार करण्याचा समावेश आहे. ११ कोटी ९९ लाख रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून, पुढील एका वर्षात स्मारकाचे काम पूर्ण करणे शक्य होणार आहे.
>आंबेडकर भवनमध्ये समावेश असलेल्या गोष्टी
भूखंडाचे क्षेत्रफळ - ५७५० चौ.मी.
बांधकाम क्षेत्रफळ - २३१० चौ.मी.
मुख्य हॉल - ३०० चौ.मी.
कॉन्फरन्स रूम - ३७ चौ.मी.
सर्विस एरिया - १७२ चौ.मी.
व्हीआयपी रूम व कार्यालय -
६४ चौ.मी.
पोडियम गार्डन - ८२५ चौ.मी.
खुले सभागृह - ८५६ चौ.मी.
प्रार्थना हॉल - ३२५ चौ.मी.
वस्तुसंग्रहालय - २६४ चौ.मी.
कलादालन - १३४ चौ.मी.
कॅफेटेरिया - ११४ चौ.मी.
वाचनालय - ११४ चौ.मी.
वॉटर बॉडी - २७५ चौ.मी.
डोम - ४९ मीटर उंच
>४९ मीटर उंचीचा डोम : आंबेकर स्मारकाच्या मुख्य इमारतीमध्ये ४९ मीटर उंचीचा डोम उभारण्यात आला आहे. बाबासाहेब विद्वत्तेचे प्रतीक आहेत. यामुळे डोमचा आकार पेनाच्या नीबप्रमाणे व उमलत्या कमळाप्रमाणे ठेवण्यात आला आहे. डोमला रंग लावण्यावर मात्र प्रशासन ठाम आहे.