वसना, माणगंगासाठी आराखडा तयार

By admin | Published: May 24, 2015 10:44 PM2015-05-24T22:44:34+5:302015-05-25T00:32:23+5:30

मुख्यमंत्री : कायम दुष्काळी भाग ‘बागायती’ करणार

Prepare the draft for fennel, mangaanga | वसना, माणगंगासाठी आराखडा तयार

वसना, माणगंगासाठी आराखडा तयार

Next

सातारा : जिल्ह्यातील वसना आणि माणगंगा या दोन नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी आराखडा तयार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ही योजना तसेच जिहे-कटापूर योजना पूर्ण करण्याचा विडा राज्य शासनाने उचलला असून, कायम दुष्काळी भाग ‘बागायती’ म्हणून नावारूपाला आणण्याचा आमचा संकल्प आहे, असे त्यांनी सांगितले.
वसना आणि माणगंगा नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी अनुक्रमे १३ आणि १७ नवीन बंधाऱ्यांचा प्रस्ताव असून, या नद्यांवरील कोल्हापूर पद्धतीचे सर्व बंधारे दुरुस्त करण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ‘मोठ्या सिंचन योजनांऐवजी स्थानिक पातळीवर छोटे जलसाठे तयार करण्याचा पर्याय शासनाने निवडला असून, जिल्ह्यात जलयुक्त शिवार ही लोकचळवळ होताना दिसते आहे. मोहिमेतील सर्व योजना सुरू होण्यापूर्वी, काम सुरू असताना आणि नंतर अशी तीन छायाचित्रे उपग्रहावरून घेतली जाणार आहेत. तसेच त्रयस्थ संस्थेकडून कामांचे मूल्यमापन करण्यात येणार असल्यामुळे भ्रष्टाचाराचा प्रश्नच उद््भवणार नाही,’ असे फडणवीस यांनी सांगितले. ‘जलयुक्त शिवार’च्या जिल्ह्यातील टीमने उत्कृष्ट काम केले असून, टंचाईमुक्तीचा शाश्वत मार्ग दृष्टिपथात आला असल्याचे ते म्हणाले.
जिल्हा रुग्णालयाच्या दुरवस्थेसंदर्भात विचारले असता, त्यासंदर्भात आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करून सर्व अडचणी दूर करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. (प्रतिनिधी)

‘लवासा’ला जमीन; कॉलेजला का नाही?
कृष्णा खोरे विकास महामंडळाची जमीन ‘लवासा’ला दिली गेली; पण सातारच्या वैद्यकशास्त्र महाविद्यालयाला जमीन देताना अनेक अटी महामंडळाने घातल्या. महाविद्यालयाच्या उभारणीतील हा प्रमुख अडथळा दूर करून आम्ही तातडीने जमीन मिळवू आणि काम सुरू करू, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.
‘जिहे-कटापूर’ पूर्ण करणारच
दुष्काळी भागाचे चित्र पालटण्याची ताकद असणारा जिहे-कटापूर प्रकल्प पूर्ण करणे राज्यपालांच्या अखत्यारीत येत असले, तरी खास बाब म्हणून हा प्रकल्प राज्यपालांच्या कार्यक्षेत्रातून बाहेर आणण्यासाठी त्यांना विश्वासात घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हा प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले असून, निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे ते म्हणाले.

Web Title: Prepare the draft for fennel, mangaanga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.