शिवसेना उमेदवारांची पहिली यादी तयार
By admin | Published: January 24, 2017 10:56 PM2017-01-24T22:56:31+5:302017-01-24T22:56:31+5:30
अकोला:महापालिका निवडणुकीत मित्र पक्ष भाजपासोबत युती करण्यापूर्वीच शिवसेनेकडून त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी तयार करण्यात आली आहे.
अंतिम निर्णयासाठी ‘मातोश्री’वर पाठवणार
अकोला:महापालिका निवडणुकीत मित्र पक्ष भाजपासोबत युती करण्यापूर्वीच शिवसेनेकडून त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी तयार करण्यात आली आहे. पहिल्या यादीला थेट ‘मातोश्री’वरून मंजूरी मिळाल्यानंतर दुसरी यादी मुंबईकडे पाठविल्या जाईल. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख पहिली यादी घेऊन बुधवारी किंवा गुरुवारी मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती आहे.
मोठ्या अभिमानाने खांद्यावर पक्षाचा झेंडा मिरवणाऱ्या राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांनी मनपाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी, म्हणून त्या-त्या पक्षाकडे रेटा लावला आहे. मुलाखत प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे इच्छुक उमेदवारांचा पक्षातील वजनदार नेते, पदाधिकाऱ्यांच्या घरी जाण्याचा ‘सिलसिला’सुरु झाला आहे. २७ जानेवारी पासून नामनिर्देशन पत्र सादर करावे लागणार असल्याने कोणता राजकीय पक्ष उमेदवारांची यादी प्रकाशित करतो,याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मुंबईसह राज्यात शिवसेना-भाजपा युतीचे गुऱ्हाळ सुरु असतानाच राज्यासह महापालिकेत सत्तेत वाटेकरी असणाऱ्या शिवसेनेने दहा प्रभागांमधील उमेदवारांची पहिली यादी तयार केली आहे. पहिल्या यादीला अंतिम मंजूरी ‘मातोश्री’वरून दिली जाईल. त्यानंतर उर्वरित प्रभागांसाठी दुसरी यादी मुंबईकडे सादर केली जाईल. त्याठिकाणी पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे, शिवसेनेचे पश्चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख तथा खासदार अरविंद सावंत यादीला मंजूरी देतील. पहिली यादी घेऊन जिल्हाप्रमुख नितीन देशमुख मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती आहे.
---------
कुटनिती करणाऱ्यांचे पत्ते कट!
शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया,माजी आ.संजय गावंडे, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, श्रीरंग पिंजरकर यांनी उमेदवारांची पहिली यादी तयार केली. पक्षाने जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच महापालिकेत प्रतिनिधीत्व करण्यासाठी अनेक शिवसैनिकांना संधी उपलब्ध करून दिली. त्याऐवजी संबंधितांनी पक्षाच्या ध्येयधोरणाकडे दुर्लक्ष करून पक्षांतर्गत कुरघोडीला प्राधान्य दिल्याचे स्थानिक नेत्यांच्या निदर्शनास आले. निष्ठावान शिवसैनिकांसोबत कुटनिती करणाऱ्यांचे पत्ते कट करण्यात आल्याची माहिती आहे.