पाकिस्तानचा सूड घेण्याच्या तयारीला लागा! - उद्धव ठाकरे
By admin | Published: July 15, 2017 07:47 AM2017-07-15T07:47:05+5:302017-07-15T07:51:08+5:30
जम्मू काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या हल्ल्याचा सूड घेण्याच्या तयारीला लागायला हवे, असे उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमध्ये म्हटले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी 10 जुलैच्या रात्री अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर अंदाधुंद गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात 7 भाविक मरण पावले आणि तीन पोलिसांसह 32 जखमी झाले. मृतांमध्ये पाच महिला यात्रेकरू आहेत. या पार्श्वभूमीवर पाकड्यांचे हे ‘सोंग’ आणि ‘ढोंग’ ओळखून हिंदुस्थानने अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा सूड घेण्याच्या तयारीला लागायला हवे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानच्या सीमारेषेवरील कुरापती वाढल्या आहे. शस्त्रसंधीचे उल्लंघन, दहशतवादी हल्ले, शहीद जवानांच्या मृतदेहाची विटंबना करणे यांसारख्या घटनांवर संताप व्यक्त करत उद्धव ठाकरे यांनी पाकिस्तानचा सूड घेण्याच्या तयारीला लागायला हवे असे म्हटले आहे.
शिवाय, पाकिस्तानला साथ देणा-या चीनच्या भूमिकेवरही सामना संपादकीयमधून ताशेरे ओढण्यात आले आहेत.
आणखी बातम्या वाचा
नेमके काय आहे सामना संपादकीय?
पाकिस्तानचे नवे ढोंग
पाकिस्तानसारखा ढोंगी देश आणि पाकडय़ांसारखे खोटारडे राज्यकर्ते जगाच्या पाठीवर कुठेही सापडणार नाहीत. बरं, हे ढोंग आणि खोटेपणाचा बुरखा कित्येकदा टराटरा फाटला आणि जागतिक पातळीवर पाकिस्तानच्या अब्रूचे धिंडवडे निघाले तरी असत्याच्या वाटेवरील फरफट सोडायला हा देश तयार नाही. आताही पाकिस्तानने नवे ढोंग रचले आहे. हिंदुस्थानी सैन्याने मागील सात महिन्यांत ५४२ वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचा कांगावा पाकिस्तानने सुरू केला आहे. अमरनाथ यात्रेकरूंवरील दहशतवादी हल्ला आणि त्यातील पाकिस्तानचा सहभाग यावरून जगाचे लक्ष विचलित करण्यासाठीच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही थाप ठोकली हे उघड आहे. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस झकेरिया यांनी हा फुसका बॉम्ब फोडला. वास्तविक पाकिस्तानी लष्कर, त्यांची आयएसआय ही गुप्तचर संस्था आणि एकूणच पाकिस्तानी सरकार हिंदुस्थानविरुद्ध सदैव कुरापती काढत असतात हे आंतरराष्ट्रीय सत्य आता जगाने स्वीकारले आहे. हिंदुस्थानातील घातपाती कारवाया आणि दहशतवादी हल्ल्यांमागे पाकडय़ांचेच सैतानी डोके असते हे प्रत्येक वेळी जगासमोरही आले. हिंदुस्थानने युद्धबंदी मोडून ५४२ वेळा सीमेवर हल्ले चढवले या बंडलबाजीवर खुद्द पाकिस्तानी जनतेचाही विश्वास बसणे कठीणच आहे. तरीही त्या देशाचे
हिंदुस्थानविरुद्धच बांग
ठोकणे सुरूच असते. पाकिस्तानी सैन्याने सीमेवर गोळीबार करायचा, तोफांचा भडीमार करायचा आणि हिंदुस्थानी सैन्याला एका दिशेला चकमकीत गुंतवून ठेवतानाच दुस-या बाजूने प्रशिक्षित केलेले अतिरेकी हिंदुस्थानी हद्दीत घुसवायचे हे पाकडय़ांचे जुनेच कारस्थान आहे. पाकिस्तानच्या गोळीबाराला हिंदुस्थानी जवानांनी उत्तर दिले की, ‘‘शस्त्रसंधी मोडली हो’’ म्हणून गळा काढायचा हे पाकिस्तानचे ‘ढोंग’ आणि ‘सोंग’ आता जगाला चिरपरिचित झाले आहे. हिंदुस्थानने मागच्या सात महिन्यांत युद्धबंदी मोडून केलेल्या गोळीबारात पाकिस्तानी सैनिकांसह १८ जणांचा मृत्यू झाला असा दावा पाकिस्तानी प्रवक्त्याने केला आहे. समजा, पाकिस्तानचा हा दावा क्षणभर मान्य केला तरी एक प्रश्न उरतोच! हिंदुस्थानी सैन्याने जर पाचशेहून अधिक वेळा युद्धबंदी मोडून पाकिस्तानी हद्दीत गोळीबार केला असेल तर फुटकळ अठराच पाकडे कसे काय मरण पावले? मृतांचा आकडाही मग शेकडय़ांतच असायला हवा होता. चार-चार युद्धांत हिंदुस्थानकडून पराभवाची धूळ चाखल्यानंतरही हिंदुस्थानी सैनिकांच्या नेमबाजीवर पाकडय़ांनी अशी शंका घ्यावी हे बरं नाही! याचा अर्थ स्पष्ट आहे युद्धबंदी पाकिस्तानकडूनच मोडली जाते. त्याला चोख प्रत्युत्तर तर मिळणारच. पाकिस्तानने आधी आगळीक करायची आणि हिंदुस्थानी जवानांनी गोळीबाराला गोळीबारानेच उत्तर दिले की, शस्त्रसंधी मोडल्याचा कांगावा करायचा
हा पोरकटपणा
आहे. हिंदुस्थानकडून होत असलेल्या युद्धबंदीच्या उल्लंघनामुळे प्रादेशिक शांततेला धोका निर्माण झाला आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त होत आहे अशी फुसकुलीही पाकिस्तानने सोडली आहे त्यावर विश्वास कोण ठेवणार? नाही म्हणायला हे रडके बाळ मांडीवर घेणाऱया चीनच्या नकटय़ा मामूंशिवाय पाकडय़ांचे हे नकली अश्रू पुसायला कोण पुढे येणार? वास्तविक हिंदुस्थानने ५४२ वेळा युद्धबंदी मोडली हेच सफेद झूठ आहे. उलट पाकिस्ताननेच गेल्या अडीच-तीन वर्षांत हजाराहून अधिक वेळा युद्धबंदी मोडून सीमेवरील चौक्या आणि हिंदुस्थानच्या सीमावर्ती गावांवर हल्ले चढवले. हिंदुस्थानी हद्दीत घुसून दोन जवानांची निर्घृण हत्या केली, त्या दोन्ही जवानांचे शीर धडावेगळे करून मृतदेहांची क्रूर विटंबना केली. पाकिस्तानने सीमेवर केलेले हल्ले आणि कश्मीर खोऱयात अतिरेक्यांमार्फत घडवलेले हल्ले यात हिंदुस्थानचे दोनशेहून अधिक जवान शहीद झाले. अमरनाथ यात्रेवर झालेल्या ताज्या हल्ल्यातही पाकिस्तानचाच हात आहे. अबू इस्माईल हा पाकिस्तानी अतिरेकीच या हत्याकांडाचा सूत्रधार आहे. या हल्ल्यातील पाकिस्तानी सहभागाचे पुरावेच समोर येत आहेत. त्यामुळेच हिंदुस्थानने युद्धबंदी मोडून पाचशेहून अधिक वेळा सीमेवर हल्ले केल्याचा कांगावा पाकडय़ांनी सुरू केला आहे. पाकडय़ांचे हे ‘सोंग’ आणि ‘ढोंग’ ओळखून हिंदुस्थानने अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा सूड घेण्याच्या तयारीला लागायला हवे!