पल्स पोलिओ मोहिमेसाठी यंत्रणा सज्ज
By admin | Published: January 20, 2017 03:03 AM2017-01-20T03:03:27+5:302017-01-20T03:03:27+5:30
जागतिक आरोग्य संस्थेने (डब्ल्यूएचओ) भारत पोलिओमुक्त झाला असल्याचे जाहीर केले आहे
जयंत धुळप,
अलिबाग- जागतिक आरोग्य संस्थेने (डब्ल्यूएचओ) भारत पोलिओमुक्त झाला असल्याचे जाहीर केले आहे. भारतात पोलिओला पुन्हा प्रवेश मिळू नये, त्यावर नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम येत्या २९ जानेवारी रोजी संपूर्ण देशात एकाच वेळी आयोजित करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ती प्रभावीपणे राबविण्याकरिता रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले व रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. याबाबतची माहिती रायगड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
रायगड जिल्ह्यात ग्रामीण भागात अपेक्षित लाभार्थी २ लाख १८ हजार ४९९ आहेत तर शहरी भागात अपेक्षित लाभार्थी ५२ हजार ५८० असे एकूण २ लाख ७१ हजार ७९ एकूण लाभार्थी बालके आहेत. लसीकरणाकरिता ग्रामीण भागात २ हजार ९१४ व शहरी भागात २४३ अशा एकूण ३ हजार १५७ बुथवर लसीची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त रेल्वे स्थानक, बस स्थानके आदि ठिकाणी सुध्दा लस देण्याची व्यवस्था आहे.
या लसीकरण कार्यक्र मासाठी ग्रामीण भागात ६ हजार ५३५ आरोग्य कर्मचारी व शहरी भागात ६८९ अशा एकूण ७ हजार २२४ आरोग्य कर्मचाऱ्यांची बुथवर नेमणूक करण्यात आली असून अंगणवाडी सेविका, शिक्षक तसेच खासगी संस्थांना देखील यामध्ये सहभागी करु न घेतले आहे. ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांचे पोलिओपासून संरक्षण करण्यासाठी ही लस देणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वांनी ५ वर्षांखालील सर्व बालकांना यादिवशी पोलिओची लस पाजून या कार्यक्र मात सहभागी व्हावे व सहकार्य करावे, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
सन १९९४ मध्ये आपल्या देशात पोलिओ निर्मूलनाकरिता ही पल्स पोलिओ मोहीम सुरु करण्यात आली, त्यास आता २३ वर्षे पूर्ण होत आहेत. पोलिओची लस इंजेक्शनद्वारे देखील दिली जाते. अमेरिकेमध्ये ही पद्धत वापरली जाते. परंतु इंजेक्शनव्दारे पोलिओ लस बाळाला देणे हे खूप खर्चीक आहे. त्यावर पर्याय म्हणून ‘ओरल पल्स पोलिओ लस’ म्हणजे तोंडातून देण्याची लस भारतात वापरण्यात आली आणि भारतात एकाच दिवशी देशभर पल्स पोलिओ मोहीम आयोजित करण्याची पद्धती वापरुन भारत पोलिओमुक्त करण्यात आपल्या आरोग्य यंत्रणेस यश आले असून त्याचे प्रमाणीकरण जागतिक आरोग्य संस्थेने केले असल्याचे डॉ. गवळी यांनी सांगितले.
पोलिओच्या विषाणूंची संख्या एकने कमी
प्र्रारंभीच्या काळात पोलिओचे तीन विषाणू सक्रिय होते. पल्स पोलिओ प्रतिबंध लस मोहिमा गेल्या २३ वर्षांत देशात सातत्याने झाल्यामुळे आता संभाव्य पोलिओच्या विषाणूंची संख्या एकने कमी होवून दोनवर आली आहे. भारताशेजारी देशात काही ठिकाणी पोलिओचे रुग्ण निष्पन्न होतात. आपल्या देशातील बालकांना कोणत्याही प्रकारे संसर्ग होवू नये याकरिता आता आपल्या देशातील बालकांची पोलिओ रोग प्रतिबंधात्मक शक्ती अबाधित ठेवून वृद्धिंगत करण्याकरिता या मोहिमांचे सातत्य ठेवण्यात आले असल्याचे डॉ.गवळी यांनी स्पष्ट केले आहे.
।शहरी भागात बुथ : २९ जानेवारी रोजी होणाऱ्या या मोहिमेत ०ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओचा जादा डोस देण्यात येणार आहे. यंत्रणा मोहिमेकरिता सज्ज झाली आहे. यासाठी ग्रामीण भागातील ५२ प्राथमिक आरोग्य केंद्र त्याचप्रमाणे शहरी भागात बुथ उभारण्यात येणार असून या बुथवर या दिवशी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळात ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओचा डोस देण्यात येणार आहे.