चंदू चव्हाणला सोडण्यास पाक तयार
By admin | Published: January 13, 2017 04:51 AM2017-01-13T04:51:04+5:302017-01-13T04:51:04+5:30
नजरचुकीने सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचलेला भारतीय जवान चंदू चव्हाण याच्या
मुंबई : नजरचुकीने सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचलेला भारतीय जवान चंदू चव्हाण याच्या सुटकेबाबत पाकिस्तान सकारात्मक असून, लवकरच तो मायदेशी परतेल, असा विश्वास संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिला. गुरुवारी, मुंबईतील माझगाव गोदीत स्वदेशी बांधणीच्या ‘खांदेरी’ या पाणबुडीच्या जलावतरणाचा सोहळा राज्यमंत्री भामरे यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी चंदू चव्हाणच्या सुटकेबाबत माहिती दिली. चंदू चव्हाण हा धुळ्यातील जवान भारत-पाकिस्तान सीमारेषा ओलांडून पाक सैनिकांच्या जाळ्यात अडकला. भारतीय लष्कराच्या सर्जिकल स्ट्राइकनंतर चंदू चव्हाण आयताच पाकच्या जाळ्यात अडकल्याने त्याच्या सुटकेबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. चव्हाण जिवंत आहे, त्याची चौकशी पूर्ण झाली आहे आणि आम्ही त्याला लवकरच सोडू, असे पाकिस्तानकडून सांगण्यात आल्याचे सुभाष भामरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)