‘विकेल ते पिकेल’साठी बीज उत्पादनापासून मार्केटिंगपर्यंतचा आराखडा तयार करा! - उद्धव ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 07:48 PM2020-10-27T19:48:07+5:302020-10-27T19:54:18+5:30
Uddhav Thackeray, Joint Agresco ‘संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती २०२०’ची ४८ वी सभा अकोला येथे ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती.
अकोला: आपण शेतकऱ्यांना विविध योजनांमधून मदत करतो, अनुदाने देतो. पिकांसाठी हमीभावदेखील देतो. पण हमखास भाव मिळावा, यासाठी शासन आग्रही आहे. त्यादृष्टीने बाजारपेठ संशोधनाकडे अधिक जागरुकतेने लक्ष देण्याची गरज व्यक्त करताना त्यांनी ‘विकेल ते पिकेल’ तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग करत बीज उत्पादनापासून ते मार्केटिंगपर्यंतचा सुस्पष्ट, कालबद्ध आणि सकारात्मक परिणामांच्या दिशेने वाटचाल करणारा एक निश्चित संशोधन आराखडा राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी एकत्र बसून शासनास सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठअकोला आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांनी ‘संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती २०२०’ची ४८ वी सभा अकोला येथे ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
ऑनलाइन पद्धतीने पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषी मंत्री तथा प्रतिकुलपती कृषी विद्यापीठे दादाजी भुसे हे होते. या कार्यक्रमास केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे, राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांची विशेष उपस्थिती लाभली. तर या कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू, सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम व फलोत्पादन, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, कृषी सचिव एकनाथ डवले आणि कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणेचे महासंचालक विश्वजीत माने तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरु डॉ. के. पी. विश्वनाथा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे कुलगुरु डॉ. ए. एस. ढवण, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरु डॉ. एस. डी. सावंत आदी मान्यवरही सहभागी झाले.
मुख्यमंत्री म्हणाले की, शेतीमध्ये माहिती-तंत्रज्ञानाचा उपयोग वाढला पाहिजे, असे तंत्रज्ञान संशोधकांनी विकसित करण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय कृषी कायद्यातील सुधारणा या शेतकरी हिताच्या असाव्यात, ही आपली आग्रही भूमिका असून, यासाठी केंद्र शासनाने राज्यांच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या बैठका घेऊन त्यांची मते घ्यावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कृषी शिक्षण घेऊन बाहेर पडतात. ते पुढे काय करतात, कोणत्या क्षेत्रात? काम करतात, कृषी क्षेत्रातच कार्यरत आहेत की अन्य क्षेत्रात? याचा आढावा कृषी विद्यापीठांनी घ्यावा. संशोधकांची बुद्धी, माहिती आणि जैव तंत्रज्ञान, बाजारपेठ संशोधन यामधून शेतकऱ्यांसाठी एक परिपूर्ण संशोधन असलेले प्रॉडक्ट या पाच दिवसांच्या संशोधन समितीच्या बैठकीत निश्चित केले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली, यावेळी कृषी मंत्री दादाजी भुसे व केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनीही मार्गदर्शन केले
या राज्यस्तरीय बैठकीचे स्वागताध्यक्ष डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम भाले यांनी प्रारंभी दीपप्रज्वलन करून डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बैठकीचे प्रयोजन व रुपरेषा स्पष्ट केली.
मुख्यमंत्र्यांना ‘खाकी’ची भुरळ
आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठास दिलेल्या भेटीच्या आठवणीचा उल्लेख केला, तसेच येथील संशोधन असलेल्या खाकी रंगाच्या कापसाच्या वाणाबद्दलही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. अन्य रंगांमधील कापसाचे वाण विकसित करता येतात का? याबद्दल विद्यापीठाने संशोधन करावे, असेही त्यांनी सांगितले.