अंगारकीसाठी सिद्धिविनायक मंदिर सज्ज
By admin | Published: June 11, 2017 03:35 AM2017-06-11T03:35:39+5:302017-06-11T03:35:39+5:30
दादर-प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर १३ जूनच्या अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त सज्ज झाले आहे. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासकडून
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दादर-प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर १३ जूनच्या अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त सज्ज झाले आहे.
श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिला व पुरुष भाविकांसाठी मुखदर्शन आणि दुरून दर्शनासाठी एस. के. बोले मार्गावरील आगर बाजार ते सिद्धी प्रवेशद्वारादरम्यान उभारण्यात आलेल्या रेलिंगमधून भाविकांना मंदिर प्रवेशद्वार क्रमांक १ मधून प्रवेश दिला जाईल. दर्शनासाठी पुरुष आणि महिला भाविकांसाठी वेगवेगळ्या रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे. पुरुष भाविकांना शंकर घाणेकर मार्ग-सयानी रोडवरील रवींद्र नाट्यमंदिर येथील पदपथावरील रेलिंगमधून नर्दुल्ला टँक मैदानातील मंडपामधून मंदिरात प्रवेश दिला जाईल. महिलांना शंकर घाणेकर मार्ग - काकासाहेब गाडगीळ मार्गावरील कॉन्व्हेंट हायस्कूलच्या समोर उभारण्यात आलेल्या रेलिंगमधून रिद्धी चेकपोस्टमधून श्रींच्या दर्शनासाठी प्रवेश दिला जाईल.
मोफत वातानुकूलित बस सेवा
न्यासातर्फे श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी १२ जूनच्या रात्री १२ वाजल्यापासून १३ जूनच्या रात्री १२ वाजेपर्यंत दादर येथील कबुतरखाना ते रवींद्र नाट्यमंदिर यादरम्यान मोफत वातानुकूलित बस सेवा देण्यात येईल.
भाविकांसाठी सूचना
- सुरक्षेच्या कारणास्तव मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी येताना सोबत मौल्यवान वस्तू नेऊ नयेत.
- भाविकांनी सोबत लॅपटॉप, कॅमेरे व इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू नेऊ नयेत.
- फराळाकरिता धातूचे डबे न आणता प्लास्टीकचे डबे न्यावेत.
‘श्री’च्या दर्शनाच्या वेळा
- सोमवार १२ जून, मध्यरात्री १:३० ते पहाटे ३:१५ वाजेपर्यंत
- पहाटे ३:५० ते रात्रौ ९ वाजेपर्यंत
- रात्रौ १०:३० ते रात्रौ १२ वाजेपर्यंत