अमरावतीत १५ लाख मराठयांची उपस्थिती
By admin | Published: September 22, 2016 07:24 PM2016-09-22T19:24:54+5:302016-09-22T19:24:54+5:30
कोपर्डी प्रकरणाचा निषेध, अॅट्रॉसिटीमधील बदल आणि मराठा समाजाला आरक्षण, या प्रमुख मागण्यांसाठी गुरूवारी निघालेल्या मराठा मूक क्रांती मोर्चाला अमरावतीत अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
ऑनलाइन लोकमत
अमरावती, दि. २२ : कोपर्डी प्रकरणाचा निषेध, अॅट्रॉसिटीमधील बदल आणि मराठा समाजाला आरक्षण, या प्रमुख मागण्यांसाठी गुरूवारी निघालेल्या मराठा मूक क्रांती मोर्चाला अमरावतीत अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अकोल्याचे आकडे ब्रेक करणाऱ्या या मोर्चात जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून लाखो मराठे अंबानगरीत दाखल झाले होते. महिला, तरूणी आणि विद्यार्थ्यांचा सहभाग भुवया उंचावणारा होता. मोर्चात १५ लाखांपेक्षा अधिक लोक सहभागी झाल्याचे आकडे आहेत. या मोर्चातून मराठ्यांनी अमरावतीत आदर्श इतिहास घडविला.
नेहरू मैदानातून सकाळी ११ वाजताच्या सुमारास मराठ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच केली. जयस्तंभ, मालवीय, इर्विन चौकमार्गे हा मोर्चा दुपारी दीडच्या सुमारास गर्ल्स हायस्कूल चौकात पोहोचला. निषेधाचे प्रतीक असलेल्या काळ्या वेशातील पाच मराठा मुलींनी तेथे प्रातिनिधिक स्वरूपात भावना व्यक्त केल्यात. नंतर कोपर्डी येथील पीडितेसह उरी येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना मूक श्रद्धाजंली वाहण्यात आली. त्यानंतर चार मुलींनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना दिले.
अमरावती शहराचा रंगच जणू सकाळपासून भगवा झाला होता. शिवछत्रपतींच्या सुराज्याची, स्वराज्याची आठवण करून देणारे भगवे झेंडे सर्वत्र लहरत होते. शहरात न मावणाऱ्या मराठ्यांच्या सहभागानंतरही जराही बेशिस्त या मोर्चादरम्यान आढळली नाही. जणू सर्वजण सैनिक दलातील प्रशिक्षित व्यक्ती असावेत या पद्धतीने अतिशय शिस्तबध्दरीत्या मोर्चा मर्गक्रमण करीत होता. मोर्च्यात सहभागी झालेल्या मराठ्यांनी डोक्यावर पांढरी टोपी, दंडाला काळी फित तर काहींनी काळा पेहराव केला. अमरावतीच्या इतिहासात हा मोर्चा 'रेकॉर्डब्रेक' ठरला.
सकाळी आठ वाजतापासूनच शहराच्या चारही बाजूंनी मराठ्यांच्या झुंडीच्या झुंडी शहरात दाखल होत होत्या. गर्ल्स हायस्कूल चौकामध्ये ज्यावेळी मराठा महिला एकत्र आल्यात, त्याचवेळी शहरातील राजकमल चौक, पंचवटी चौक, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रस्त्यानेही लाखो मराठ्यांची गर्दी उसळली होती. या गर्दीला मराठा हा एकमेव चेहरा होता. शहरातील सर्वच व्यापारी प्रतिष्ठानांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून मराठा मोर्चात अनौपचारिक सहभाग नोंदवला. १५ लाख मराठ्यांची गर्दी रस्त्यावर असूनही पोलिसांची जराही तारांबळ उडाली नाही.
पूर्व उपयायोजना म्हणूून शहरातील शैक्षणिक संस्थांनी गुरूवारी विद्यार्थ्यांना सुटी जाहीर केली होती. महापालिकेच्या सर्व शाळा पहिल्या सत्रात बंद ठेवण्यात आल्यात. महापालिकेची शहर बस सेवा बंद होती. दळवळणाची अन्य यंत्रणाही बंद ठेवण्यात आली होती. शिस्त, आदर्श नियोजन, महिला-तरूणींना प्राधान्य, मोर्चेकऱ्यांची काळजी, पाणी, प्रथोमचाराची व्यवस्था, मोर्च्यानंतरची स्वच्छता हे सर्व बघितल्यावर आपण भारतातच आहोत की कुण्या अतिप्रगत देशात, असा प्रश्न उपस्थिततांच्या मनाला स्पर्शून जायचा.
नियोजन फत्ते
चार सप्टेंबरपासून मोर्चाच्या यशस्वीतेसंदर्भात नियोजन बैठकी सुरू होत्या. ते नियोजन गुरूवारी फत्ते झाले. मोर्चाची वेळ सकाळी ११ वाजताची असली तरी सकाळी आठपासूनच स्वयंमस्फूर्तीने जथ्ये नेहरू मैदान आणि राजकमल चौकाकडे झेपावले गेलेत. काहीवेळाच वातावरण मराठामय झाले. नेहरू मैदानातून निघालेला हा मोर्चा गर्ल्स हायस्कूल चौकात विसावला. सर्वात पुढे मुली आणि महिला लाखोंच्या संख्येत होत्या. त्यानंतर वकील, डॉक्टर, विद्यार्थी तरूण, सर्वसामान्य नागरिक आणि शेवटी राजकीय पुढारी, अशी मोर्चाची रचना होती. लाखांवर भगवे झेंडे घेऊन तरूण सहभागी झाले होते. 'एक मराठा, लाख मराठा', उल्लेखाच्या टोप्यांनी जान फुंकली होती.
घालून दिला आदर्श
अमरावतीच्या मूक मोर्चाने एक आदर्श उदारण घालून दिले. कोणतीही घोषणाबाजी, हुल्लडबाजी दिसून आली नाही. लोकांना त्रास होईल, असे कोणतेच कृत्य मोर्चात पहावयास मिळाले नाही. सर्वजण शांततेत मोर्चात सहभागी होत होते. मात्र लोकांच्या चेहऱ्यावर मूक आक्रोश व्यवस्थेविरूद्धची चीड आणि उद्रेक स्पष्ट दिसत होता.