लाखो भाविकांच्या उपस्थितीत माहूरला नवरात्रोत्सवाची समाप्ती
By admin | Published: October 11, 2016 03:12 PM2016-10-11T15:12:07+5:302016-10-11T15:14:32+5:30
लाखो भाविक-भक्तांच्या उपस्थितीत ध्वजपूजन, शस्त्रपूजन, भगवान परशुरामांच्या पालखीद्वारे सीमोल्लंघन करून महाप्रसाद वाटपानंतर माहुरातील नवरात्र महोत्सवाची विधीवत सांगता मंगळवारी झाली़
ऑनलाइन लोकमत
श्रीक्षेत्र माहूर, दि. ११ - लाखो भाविक-भक्तांच्या उपस्थितीत ध्वजपूजन, शस्त्रपूजन, भगवान परशुरामांच्या पालखीद्वारे सीमोल्लंघन करून महाप्रसाद वाटपानंतर माहुरातील नवरात्र महोत्सवाची विधीवत सांगता मंगळवारी झाली़
१ आॅक्टोबरपासून माहूरच्या रेणुकामाता मंदिरात आयोजित शारदीय नवरात्र महोत्सवात ११ दिवस भाविकांना अलंकारासह दररोज नवीन रंगाच्या पैठणी, महावस्त्रांसह देवीचे दर्शन घेता आले़ घटस्थापना, महापूजा, महाआरती, महाप्रसाद, दुर्गा सप्त शतचंडी पाठ, छबिना मिरवणूक, भजन, पंचपदी, गायन, पायस नैवेद्य, कुमारीका पूजन, सुहासिनी पूजन, परिवार देवता पूजन, महाकाली माता पूजन, शतचंडी महायज्ञ, देवता स्थापन, भगवान परशुरामांची पालखी, सीमोल्लंघन, महाप्रसाद आदी कार्यक्रम माहुरात पार पडले़
नवरात्रोत्सवाच्या शेवटच्या दिवशी विश्वस्त समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद यावलकर, उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलिस अधिकारी रमाकांत खरात, सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ़राजेंद्र भारूड, कोषाध्यक्ष तथा तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते यांच्या उपस्थितीत विश्वस्त तथा पुजारी भवानीदास भोपी, चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, समीर भोपी, विनायकराव फांदाडे, श्रीपाद भोपी, आशिष जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ध्वजपूजन, रेणुका मातेची महापूजा, महाआरती केल्यानंतर केशरी पिवळ्या रंगाचे महावस्त्र चढवून शेवटची माळ चढविण्यात आली़ दुपारी श्री भगवान परशुरामांची पालखी काढण्यात येवून सीमोल्लंघन, आरती झाल्यानंतर सर्व भाविकांना महाप्रसाद देण्यात आला़
नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांना त्रास होवून नये यासाठी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, पोलिस अधीक्षक संजय येनपुरे यांनी दोनवेळा माहूरला भेटी देवून आढावा घेतला़ उपविभागीय पोलिस अधिकारी अविनाश बारगळ उत्सव संपेपर्यंत माहुरात तळ ठोकून होते़ रेणुकादेवी संस्थानच्या विश्वस्त समितीने दर्जेदार सुविधा दिल्याने सुखदायक दर्शन होवून भाविक समाधानी झाले़