'बाप्पां'च्या आगमनाला असणार 'वरुणराजा'ची हजेरी;पुढील चार दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 08:05 PM2020-08-19T20:05:00+5:302020-08-19T20:05:49+5:30

कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

The presence of 'rain' will be on the arrival of 'Bappa'; Chance of heavy rains in the state for the next four days | 'बाप्पां'च्या आगमनाला असणार 'वरुणराजा'ची हजेरी;पुढील चार दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता

'बाप्पां'च्या आगमनाला असणार 'वरुणराजा'ची हजेरी;पुढील चार दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता

Next
ठळक मुद्देबंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्यामुळे मध्य भारत, उत्तर भारतासह राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.पुढील ४ दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात २२ व २३ ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे गणरायांच्या आगमनाला वरुणराजाची जोरदार हजेरी लावणार असल्याची शक्यता आहे. 
गेल्या २४ तासात कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस झाला. 
घाटमाथ्यावरील ताम्हिणी १९०, कोयना (नवजा) १४०, दावडी १३०, डोंगरवाडी १२०, शिरगाव, भिरा ११०, महाबळेश्वर येथे १०० मिमी पावसाची नोंद झाली होती. कोकणातील बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला़ मराठवाडा व विदर्भात अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र बुधवारी सकाळी तयार झाले आहे. तसेच उत्तर भारतात द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने सध्या देशात सर्वत्र चांगला पाऊस होत आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ईशान्य भारत, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेशासह हिमाचल प्रदेशापर्यंत जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.अरबी समुद्रावरुन येणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढला आहे. त्यामुळे गुजरात, कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

पुणे, सातारा जिल्ह्यात चार दिवस जोरदार 
पुणे व सातारा जिल्ह्यात २० ते २३ ऑगस्ट दरम्यान घाट परिसरात जोरदार ते अतिजोरदार वृष्टी होण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार दिवस जोरदार पावसाची शक्यता असून रायगड जिल्ह्यात २२ व २३ ऑगस्टला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे़.२० ऑगस्टला परभणी, हिंगोली, कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असून २१ ऑगस्टला जालना, औरंगाबाद, नंदूरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. 
पुणे शहरात गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत बुधवारी उघडीप मिळाली़ दिवसभरात अनेकदा सूर्यदर्शनही झाले. १ जूनपासून पुणे शहरात तब्बल ५५६़५ मिमी पावसाची नोंद झाली असून ती सरासरीच्या तुलनेत १५० मिमीने अधिक आहे. लोहगाव येथे आतापर्यंत ५९० मिमी पाऊस झाला असून तो सरासरीपेक्षा २५५.४ मिमीने अधिक आहे.पाषाण येथे आतापर्यंत ५़0४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील चार दिवस शहरात मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता असून घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Web Title: The presence of 'rain' will be on the arrival of 'Bappa'; Chance of heavy rains in the state for the next four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.